Roshni Songhare in Ahmedabad plane crash update
ठाणे/डोंबिवली : अहमदाबाद येथे १२ जून रोजी झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या डोंबिवलीकर हवाई सुंदरी रोशनी सोनघरे (वय २७) हिचे पार्थिव आज (दि.१९) तिच्या डोंबिवलीतील निवासस्थानी आणण्यात आले.
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानात रोशनी फ्लाईट क्रू सदस्य म्हणून कार्यरत होती. तिचे पार्थिव घरी पोहोचताच कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेने संपूर्ण डोंबिवली शहरावर शोककळा पसरली आहे.
रोशनी ही डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पथ परिसरातील नव उमीया कृपा सोसायटीमध्ये आपले आई-वडील आणि भाऊ विघ्नेशसोबत राहत होती. तिचा भाऊ विघ्नेश एका खाजगी शिपिंग कंपनीत नोकरीला आहे. आई-वडिलांचा निरोप घेऊन ती आपल्या कामासाठी अहमदाबादला गेली होती आणि तेथून लंडनच्या दिशेने जाणाऱ्या विमानात ती कार्यरत होती, मात्र दुर्दैवाने याच विमानाला अपघात झाला आणि त्यात रोशनीचा अंत झाला.
आज सकाळपासूनच रोशनीच्या इमारतीबाहेर परिसरातील नागरिक आणि तिच्या मित्र-मैत्रिणींनी गर्दी केली होती. तिचे पार्थिव घरी आणल्यानंतर उपस्थित नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांनाही आपल्या भावना अनावर झाल्या. एअर इंडियातील तिचे सहकारी कर्मचारी देखील रोशनीच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी डोंबिवलीत दाखल झाले होते. या सर्वांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात रोशनीला अखेरचा निरोप देण्यात आला.