कसारा; शाम धुमाळ : जव्हार, मोखाडा, खोडाळा, विहिगाव सह 12 गाव पाड्यातील चाकर मानी व ग्रामस्थ वाहनचालकांना आता ब्रिटिश कालीन बोगद्यातून थेट नवीन कसारा घाट मार्गे कसारा, कल्याणकडे जाण्यासाठी रस्ता खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून जीव मुठीत घेऊन प्रवास करणाऱ्या गोर गरीब आदिवासी बांधवांचा प्रवास आता सुखकर होणार आहे.
जव्हार फाट्याहून कसाराकडे लोकल पकडण्यासाठी किंवा बाजार हाट साठी जाण्यासाठी किंवा मुबई ठाणे येथे कामधंद्यासाठी वरील ठिकाणाहून अनेक ग्रामस्थ चाकर मानी दुचाकी, एस टी बससह खासगी वहानांनी कसारा येतात व तिथून लोकलने पुढील प्रवास करतात. परंतु हा प्रवास करताना हे वाहतूकदार, वाहन चालक जव्हार फाटा मार्गे मुबई नाशिक महामार्गांवरील जुन्या कसारा घाटातून रॉंग साईडने दोन किलोमीटरचा प्रवास करून कसारा कडे जाणाऱ्या नाशिक मुबई लेनवर यायचे. परिणामी या रॉंग साईड प्रवासामुळे अनेक आपघात जव्हार फाटा ते आंबा पॉईंट या दरम्यान होत होते. या प्रकरणी महामार्ग पोलीस घोटी केंद्र चे अधिकारी अमोल वालझडे यांनी पर्यायी रस्त्यासाठी वनविभाग यांच्या कडे मृतवस्थेत असलेल्या ब्रिटिश काळातील बोगदा बाबत चर्चा करून पाहणी केली या दरम्यान जव्हार फाट्या लागतच असलेला बोगदा थेट नवीन घाटात उतरत असल्याचे निदर्शनात आले या दरम्यान तिन्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या बोगद्या तील रस्त्याची दुरुस्ती करून तात्पुरत्या स्वरूपात जव्हार फाट्याहून कसाराकडे येणाऱ्या वाहनांना पर्यायी रस्ता सुरु करण्याचे एकमत झाले.
आज या बोगद्यातील रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात आली एक प्रायोगिक चाचणी घेतल्यानंतर या बोगद्यातून जव्हार फाट्याकडील वाहनचालकांचा प्रवास सुखकर होणार असून या कामाचा पाठपुरावा करणारे घोटी महामार्ग पोलीसचे अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन टीम कसारा व या पर्यायी रस्त्यासाठी सहकार्य करणाऱ्या वनविभागाचे संपूर्ण आदिवासी गाव पाड्यातील ग्रामस्थांनी आभार मानले.