पिंजाळ नदी पूर
पिंजाळ नदीला पूर आल्याने मलवाडा गावाजवळ नदीचा रौद्रावतार बघायला मिळत असून उज्जैनी - जव्हार मार्गावर घायपातपाडा फाट्याजवळ रस्ता पाण्याखाली गेला आहे. यामुळे उज्जैनी, विर्‍हे , वडवली व आखाडा अशा अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.  छाया : मच्छींद्र आगिवले
ठाणे

Thane News | वाड्यात मुसळधार पावसाने नद्यांना पूर

पुढारी वृत्तसेवा

वाडा : वाडा तालुक्यात रविवारपासूनच मुसळधार पाऊस सुरु असून रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे सोमवारी नदीनाले फुल्ल भरुन वाहू लागले आहेत. तालुक्यातील नद्यांची वाटचाल धोक्याच्या पातळीपर्यंत येऊ लागली असून नदी किनारी राहणार्‍या लोकांना सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. शेतीच्या कामात पावसाने खोळंबा निर्माण केला असून उज्जैनी ते झाप मार्गे जव्हार रस्ता पाण्याखाली गेला आहे.

मुसळधार पावसाने वाडा तालुक्यात थैमान घातले असून मान्सूनचा पाऊस आल्यापासून एकही दिवस त्याने उसंत न घेतल्याने जनजीवन विस्कटले आहे. रविवारपासून संततधार सुरूच असल्याने सोमवारी पिंजाळ, वैतरणा, तानसा, गारगाई व देहर्जे या नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या आहेत. नदीकिनारी दिवसेंदिवस धोकादायक बनत चालले असून लोकांनी स्वतःच सतर्क भूमिका घेणे गरजेचे झाले आहे. पिंजाळ नदी ही तालुक्यातील मुख्य जलवाहिनी असून डोंगराळ भागातील पाणी ती वाहून नेण्याचे काम करते. पिंजाळ नदीला सध्या मोठा पूर आला असून मलवाडा गावाजवळ असलेल्या पुलाजवळ नदीचा रौद्रावतार बघायला मिळत आहे. उज्जैनी - जव्हार मार्गावर घायपातपाडा फाट्याजवळ असलेली मोरी उलटून रस्ता पाण्याखाली गेला आहे. यामुळे उज्जैनी, विर्‍हे , वडवली व आखाडा अशा अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. वाडा तालुक्यातील अनेक गावांचे रस्ते लहानमोठ्या मोर्‍यांमुळे पाण्याखाली गेले असून पुरस्थितीमुळे शेतीची कामे खोळंबली आहेत.

SCROLL FOR NEXT