अनुपमा गुंडे
ठाणे : राज्यात आई-बाबा होण्याचे स्वप्न उराशी बाळगून असलेले तब्बल 2,156 पालक दत्तक मुलांच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, दत्तक प्रक्रियेतील कायदेशीर अडथळे आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे त्यांना साडेतीन वर्षांपर्यंतची प्रदीर्घ वाट पाहावी लागत आहे. एकीकडे मुलांसाठी आसुसलेले पालक आणि दुसरीकडे संस्थांमध्ये असलेली मुले, यांच्यातील दरी या किचकट प्रक्रियेमुळे वाढत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, दत्तक घेणार्या पालकांमध्ये मुलींना पसंती देण्याचा कल वाढत असल्याचेही आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
मुलांना दत्तक देण्यासाठी केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण ही राष्ट्रीय स्तरावरील संस्था कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून देशभरातील शिशुगृहे आणि सामाजिक संस्थांमार्फत दत्तक प्रक्रिया पार पाडली जाते. महाराष्ट्रात अशा 36 मान्यताप्राप्त संस्था कार्यरत असून, या संस्थांमध्ये अनाथ, पालकांनी सोडून दिलेली मुले दाखल होतात. मात्र, या मुलांना कायदेशीररीत्या दत्तक प्रक्रियेसाठी उपलब्ध करण्याच्या प्रक्रियेस होणारा विलंब हे प्रतीक्षा यादी वाढण्याचे प्रमुख कारण आहे.
60 टक्के आहे देशात आणि परदेशात दत्तक जाणार्या मुलींचे प्रमाण.
2022-23 मध्ये देशात एकूण 3,010 मुले दत्तक घेतली. ज्यामध्ये
1,724 मुली होत्या.
राज्यातील दत्तक संस्थांमधील एकूण मुले : 1,079
त्यापैकी कायदेशीररित्या दत्तक देण्यायोग्य मुले : 547
प्रतीक्षा यादीवर असलेले पालक : 2,156
ऑनलाईन नोंदणी : पालकांना केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाच्या (CARA) संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करून नोंदणी करावी लागते.
गृहभेट आणि तपासणी : नोंदणीनंतर संबंधित संस्था पालकांच्या घराची आणि कुटुंबाची सामाजिक, आर्थिक, शारीरिक आणि मानसिक स्थिती तपासते. या आधारावर एक सविस्तर अहवाल तयार केला जातो.
समुपदेशन आणि मुलाखत : पालकांचे समुपदेशन केले जाते आणि प्रदीर्घ कालावधीनंतरही त्यांची दत्तक घेण्याची इच्छा कायम आहे का, हे मुलाखतीद्वारे तपासले जाते.
मुलाची निवड : प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पालकांना मुलांची निवड करण्याची संधी दिली जाते आणि मुलांच्या आरोग्याविषयी व सामाजिक स्थितीबद्दल माहिती दिली जाते.