किन्हवली (ठाणे) : संतोष दवणे
25 व 26 ऑक्टोबरला शहापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार वादळी पावसाने भाताचे पीक घेणारा शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. भरघोस पीक शेतात दिसत असताना कापणीला आलेले भातपीक ऐनवेळी शेतात साठलेल्या पाण्यात कुजताना पाहून या आस्मानी संकटाला तोंड तरी कसे द्यायचे असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. दरम्यान 25 ऑक्टोबरला सुरु झालेला हा वादळी पाऊस काल संध्याकाळी उशिरापर्यंत बरसल्याने भातपिकांसह खळ्यातील भाताचे भारेही ओले झालेले असून भाताचे दाणेही छापले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ऑक्टोबर महिना संपत आला तरी पाऊस थांबायचे नाव घेत नसून 25 व 26 ऑक्टोबर असे दोन दिवस शहापूर तालुक्यातील सर्वच गावांत मुसळधार वादळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. किन्हवली भागात अस्नोली, मुगाव, अल्याणी, सोगाव या परिसरात भातकापणी सुरु असतानाच पावसाने पिकांची नासाडी केली आहे. दिवाळी संपताच ज्या शेतकर्यांनी भातकापणीला सुरुवात केली होती त्यांची कापलेली कडपे पाण्याने भरलेल्या शेतात तरंगत आहेत.
गरवे जातीचे उभे असलेले पीक वादळी वार्याने कोलमडून पडले असून 2 दिवसांच्या सलग पावसाने काही शेतकर्यांचे तर शंभर टक्के भातपीक पाण्यात कुजवले आहे. 6 मे पासून सुरु झालेला पावसाळा 26 ऑक्टोबर उजाडला तरी संपत नसल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. केवळ भातपिकावर गुजराण करणार्या शहापूरमधील अल्पभूधारक शेतकर्यांवर आत्महत्येची वेळ येवून ठेपल्याची प्रतिक्रिया शेतकरी देवू लागले आहेत. 20 ते 23 ऑक्टोबर दरम्यानही मुसळधार पावसाने पिकांसह मालमत्तेचे केलेले नुकसान ताजे असतानाच मागील 2 दिवसांत घातलेल्या थैमानाने होत्याचे नव्हते करून ठेवले आहे. दरम्यान संततधार सुरु असलेल्या वादळी पावसाने वीजतारा व विद्युत खांबांचेही मोठे नुकसान केल्याने वीजपुरवठाही दिर्घकाळ खंडीत झाला आहे. या नुकसानीची शहापूर महसूल विभागाने तातडीने पाहणी करून ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या द्रुष्टीने शासनाला कळवावे अशी मागणी केली जात आहे.
शहापूर तहसील अंतर्गत सुमारे 3 हजार हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे शासनाकडे पाठवण्यात आले होते.त्यापैकी बहुतांश शेतकर्यांच्या खात्यावर शासनाच्या निकषांप्रमाणे नुकसानभरपाई पडली आहे. या दोन दिवसांत झालेल्या नुकसानीचेही पंचनामे करण्याचे आदेश तलाठ्यांना देण्यात येतील.परमेश्वर कासुळे, तहसीलदार, शहापूर
25 तारखेला रात्री झालेल्या पावसात माझे सर्व भातपीक पाण्यात आडवे झाल्याने एकही चांगला दाणा हाताला लागणार नाही. मायबाप सरकारने आतातरी दखल घ्यावी.लक्ष्मण झिपा दिनकर, शेतकरी, अस्नोली