Residents of 54 buildings are in trouble again
कल्याण : पुढारी वृत्तसेवा
डोंबिवलीतील ५४ इमारतींना पालिका प्रशासनाने दोन दिवसांपासून नोटीसा बजावण्यास सुरुवात केली आहे. बेघर होण्याची भीती असल्याने आपला संसार उघड्यावर पडणार या चिंतेने रहिवाश्यांना अश्रू आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले होते की ६५ इमारतीतील नागरिकांना बेघर होऊ देणार नाही.
मात्र पालिकेच्या नोटीसांमुळे आता काय करावे, असा रहिवाश्यांना प्रश्न पडला आहे. रहिवाशी बेघर होणार नाही याकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सरकारशी संघर्ष सुरु केला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिलासा द्यावा, अशी मागणी ६५ इमारतीमधील रहिवाशांनी केली आहे.
६५ इमारतींपैकी ५४ इमारतींना कल्याण डोंबिवली महापालिकेने पुन्हा नोटीसा पाठवल्यात आहेत. या नोटीसमध्ये लवकरात लवकर इमारत रिकाम्या कराव्यात अन्यथा पोलीस बळ वापरून त्या रिकामा करण्यात येतील, असा इशारा दिला आहे. त्यामुळे या इमारतींमध्ये राहणाऱ्या हजारो रहिवाशांबर बेघर होण्याची भीती सातवीत आहे. १७ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने या इमारती निष्कासित करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसीने या ६५ इमारतींना इमारती रिकाम्या करून कारवाई करण्यासंदर्भात नोटीसा पाठवल्या होत्या.
रहिवाशांनी आक्रोश व संताप पाहून याची दखल घेत सरकारने या इमारतीमधील रहिवाशांना बेघर होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. गेल्या दोन दिवसांपासून या इमारतींना नोटीसा पाठवण्यास कल्याण डोंबिवली महापालिकेने सुरुवात केली आहे. आम्ही सर्वसामान्य कुटुंबातून आहोत, आयुष्याचे पुंजी या घरांमध्ये लावली, आमची काही चूक नाही, आम्ही कागदपत्र बघून घर घेतलं होतं, आमची फसवणूक झाली आहे.
कारवाई पण आमच्यावरच होतेय. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी याबाबत ठोस निर्णय घ्या व आम्हाला बेघर होण्यापासून वाचवा, असे रहिवाशांनी सांगितले. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांची रविवार २२ तारखेला या इमारतीतील रहिवाशांनी भेट घेतली.
प्रणव पाटील व रोहन गमरे हे रहिवाशी यांवर सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनावर ठाम रहावे व या नागरिकांना दिलासा द्यावा, असे यावेळी सांगितले. कल्याण जिल्हाप्रमुख जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सांगितले की, ६५ इमारतीमधील रहिवाशांना जे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये दिले होते त्या आश्वासनावर मुख्यमंत्र्यांनी ठाम रहावे.
प्रशासनाने मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची दखल घेऊन सगळ्या नोटिसा परत घ्याव्यात, नागरिकांना दिलासा मिळाला नाही तर मुख्यमंत्री यांची नागरिकांसह भेट घेणार आहे. ६५ इमारती मधील सर्व नागरिकांच्या पाठीशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष खंबीरपणे उभा असल्याचे सांगितले.