मुरबाडमधील नवीन उड्डाणपुलाची डागडुजी सुरू pudhari photo
ठाणे

Murbad new flyover : मुरबाडमधील नवीन उड्डाणपुलाची डागडुजी सुरू

वाहतूक अंशतः बंद, पुलाखाली जाळी; सुरक्षेबाबत प्रश्न अनुत्तरित

पुढारी वृत्तसेवा

मुरबाड शहर ः किशोर गायकवाड

मुरबाड शहरातील राष्ट्रीय महामार्ग 61 वरील नव्याने उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या तळभागावर तडेसदृश्य रेषा दिसून आल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी प्रसारित झाल्यानंतर प्रशासन आणि संबंधित यंत्रणांची हालचाल वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, पुलाखाली जाळी लावणे, खाली भराव टाकणे आणि पुलावरील एका बाजूची वाहतूक अंशतः बंद ठेवणे या घडामोडींमुळे नागरिकांच्या मनातील शंका अधिकच गडद झाल्या आहेत.

यापूर्वी पुलाच्या तळभागावर तडेसदृश्य खुणा दिसत असल्याने प्रवासी, वाहनचालक आणि व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पुलाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत असताना संबंधित विभागाकडून याबाबत कोणताही अधिकृत तांत्रिक खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे हे प्रत्यक्ष तडे होते की केवळ काँक्रीटच्या पृष्ठभागावरील दोष, याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे.

गेल्या काही दिवसांपासून कल्याणकडे जाणाऱ्या मार्गिकेचा काही भाग बॅरिकेड्स, ड्रम्स आणि इतर सुरक्षा साधनांनी बंद करण्यात आला आहे. परिणामी वाहतूक अर्ध क्षमतेने सुरू आहे. दुसरीकडे, ज्या ठिकाणी तडेसदृश्य भाग दिसून आला होता त्या पुलाखाली हिरवी जाळी लावण्यात आली असून खाली माती व भराव टाकण्यात आला आहे. त्या भागात वाहने उभी करू नयेत किंवा दुकाने थाटू नयेत यासाठी ही उपाययोजना केल्याचे दिसत आहे.

मात्र यामुळेच अनेक गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. जर सर्व काही सुरक्षित आणि नियमानुसार असेल, तर वाहतूक अंशतः का बंद करण्यात आली? पुलाखाली संरक्षक जाळी आणि भरावाची आवश्यकता का भासली? या कामाचा तांत्रिक अहवाल काय सांगतो? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागरिकांच्या सुरक्षेची हमी कोण देणार? कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पात सुरुवातीलाच दुरुस्तीची वेळ येणे हे चिंताजनक असल्याचे मत स्थानिक व्यक्त करीत आहेत. नियमित देखभाल असेल तर त्याबाबत अधिकृत माहिती जाहीर का करत नाही?अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT