डोंबिवली: क्रिकेटचा सामना संपल्यानंतर पोहण्यासाठी डोहात उतरलेल्या कल्याण येथील दोन १६ वर्षीय मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रत्नागिरीतील कोळंबे येथे घडली. सौरभ पवनकुमार झा आणि शुभम रमेश यादव अशी मृत मुलांची नावे आहेत.
पोहण्यासाठी धोकादायक मानल्या जाणाऱ्या आणि बंदी असलेल्या डोहात ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
डोहात उडी मारताना दगडावर आदळल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन आणि पुढील तपासातून स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, हा साधा अपघात नसून घातपात असल्याचा धक्कादायक आरोप मयत मुलांच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे या घटनेला वेगळे वळण लागले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी झा आणि यादव कुटुंबीयांनी केली आहे. रत्नागिरीतील कोळंबे येथे गेल्या तीन दिवसांपासून १६ वर्षांखालील मुलांचे क्रिकेट सामने सुरू आहेत.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कल्याण येथील एका क्रिकेट अकॅडमीची २० जणांचा संघ आला होता. सामना संपल्यानंतर दुपारच्या सुमारास सौरभ झा आणि शुभम यादव हे दोघे मैदानाशेजारी असलेल्या डोहात पोहण्यासाठी गेले.
त्यांच्यासोबत संघामधील इतर सहकारीही होते. संबंधित डोह जंगल परिसरात असून तो अतिशय धोकादायक मानला जातो. या डोहात पोहण्यास बंदी असल्याची माहिती आहे. मात्र, या धोक्याकडे दुर्लक्ष करून सौरभ आणि शुभम पाण्यात उतरले.
दोघांनी डोहात उडी घेतली; मात्र त्यानंतर ते पुन्हा पाण्याच्या वर आलेच नाहीत. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघे बुडाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हा प्रकार लक्षात येताच त्यांच्यासोबत असलेल्या इतर मुलांनी आरडाओरडा सुरू केला.
आवाज ऐकून स्थानिक नागरिक घटनास्थळी धावले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. दोघांना पाण्याबाहेर काढण्यात आले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जखमा दिसून आल्या.
पूर्णगड पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच पूर्णगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही मुलांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले. या घटनेची माहिती त्यांच्या नातेवाइकांना देण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
क्रिकेट खेळण्यासाठी रत्नागिरीत आलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने त्यांच्या सहकाऱ्यांसह परिसरातील नागरिकांमध्ये शोक व्यक्त होत आहे.