भिवंडी : 25 वर्षीय विवाहित महिलेशी इंस्टाग्राम वरून ओळख होऊन मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात होताच लग्नाचं आमिष दाखवून 26 वर्षीय दगाबाज प्रियकरानं पीडितेवर बलात्कार केला. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात बलात्कारासह विविध कलमानुसार गुन्हा पीडितेच्या तक्रारीवरून दाखल केला. विशेष बाब म्हणजे दगाबाज प्रियकर बलात्कार करून दुबईला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच कोनगाव पोलिसांनी जलद गतीनं तपासाची चक्र फिरवत त्याला शिताफीनं अटक केली. अश्रफ अफसर चौधरी (रा.भिवंडी) असे अटक केलेल्या दगाबाज प्रियकराचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पीडित 25 वर्षीय विवाहित कल्याण पूर्वेडील महिला हाजी मलंग रोड वरील एका इमारतीमध्ये राहते. तर अटक आरोपी अश्रफ हा भिवंडी शहरातील नवीवस्ती भागात रहातो. त्यातच दोघांची गेल्या वर्षी ओळख इंस्टाग्राम वरून झाली होती. यानंतर दोघांत मैत्री होऊन प्रेमाच्या आणाभाका घेत आरोपी प्रियकरानं लग्न करण्याचे पीडितेला आमिष दाखवले. त्यानंतर जुलै 2024 ते 27 जून 2025 पर्यंत वारंवार पीडितेवर वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केले.
या दरम्यान पीडितेने प्रियकराकडे लग्नाचा तगादा लावल्यानं त्याने लग्नास नकार दिला. यावरून आपली फसवणूक झाल्याचं समजल्यानंतर पीडितेने सामाजिक कार्यकर्ते व देहविक्री करणार्या महिलांकरिता कौन्सिलिंगचे काम करणार्या डॉ. स्वाती सिंग यांच्याकडे घडलेल्या घटनेची हकीकत सांगताच त्यांनी पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी पीडित महिलेसह कोनगाव पोलीस ठाणे गाठले.
दरम्यान पीडित महिलेच्या तक्रारीवरून कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचे गांभीर्य पाहता वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेताराम मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि धुमसे, पोह घोडसरे, पोशि संदीप सोनवणे, हेमराज पाटील यांनी तात्काळ आरोपी राहत असलेल्या परिसरात सापळा रचून त्यास अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मस्के यांनी 7 जुलै रोजी दिली असून आरोपी हा न्यायालयीन कस्टडीत असल्याचीही माहिती दिली.