राणे बंधूंतील संघर्षाचे रूपांतर आता भाजप-शिवसेना लढाईत  
ठाणे

Konkan politics : राणे बंधूंतील संघर्षाचे रूपांतर आता भाजप-शिवसेना लढाईत

पालकमंत्री नितेश राणे केनवडेकरांच्या घरी; आ. नीलेश राणे पोलिस ठाण्यात

पुढारी वृत्तसेवा

ठाणे/मालवण : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मालवण अन्‌‍ सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजप-शिवसेनेमध्ये तीव्र संघर्ष निर्माण झाला आहे.

बुधवारी सायंकाळी शिवसेनेचे नेते आ. नीलेश राणे यांनी भाजपचे पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरात प्रवेश करत पैसेवाटपासंबंधी लाईव्ह स्टिंग ऑपरेशन केले होते. त्यानंतर याच पार्श्वभूमीवर गुरुवारी भाजपचे नेते अन्‌‍ पालकमंत्री नितेश राणे यांनी केनवडेकर यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. बुधवारचा संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला. यावेळी आमची बदनामी करू नका, असा इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे. तर, दुसरीकडे आ. नीलेश राणे यांनी बुधवारच्या तक्रारीनंतर निवडणूक यंत्रणा, तसेच पोलिसांनी काय केले, याची माहिती घेण्यासाठी निवडणूक अधिकारी, पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली. या सर्व घडामोडी सुरू असताना प्रदेश पातळीवरूनही यावर टीकाटिपणी सुरू झाली. मला दोन तारीखपर्यंत युती टिकवायची आहे. मात्र, काहीजणांच्या पायाखालची वाळू सरकल्याने ते आमच्यावर खोटे आरोप करत आहेत. भाजप कार्यकर्त्यांकडील रोख रक्कम ही त्यांच्या व्यवसायातील होती, असे प्रतिउत्तर रवींद्र चव्हाण यांनी दिले आहे.

शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी भाजप आमचा मित्रपक्ष आहे, त्यांच्याबाबत आमची भूमिका सौम्य असल्याचे म्हटले आहे. तसेच, रवींद्र चव्हाणांचा मुद्दा आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाजपच्या निवडणुकीच्या धोरणावर जोरदार टीका केली आहे.

माझी जिरवण्यासाठी रवींद्र चव्हाण यांचा भाऊ मालवण शहरात : आ. नीलेश राणे

पैसे वाटण्याची संस्कृती जिल्ह्यातील नाही, ती बाहेरून आली आहे. अशी निवडणूक झाली तर इतर उमेदवार टिकू शकतात का? भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण 25 तारखेला मालवणात आले, त्यामुळे मला संशय होता असे काही तरी घडेल, म्हणून पाठलाग केला तर केनवडेकर यांच्या घरापर्यंत पोहोचलो. हे सगळे थांबवण्यासाठी माझा हा प्रयत्न आहे. रवींद्र चव्हाण यांचे बंधू संकेत चव्हाण हे मालवणमध्येच या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी राहिले आहेत. नीलेश राणे यांची जिरवण्यासाठी आपला घरातलाच माणूस ठेवला जात असेल, तर आम्ही निवडणूक लढवायची कशी? असा सवालही आ. नीलेश राणे यांनी केला.

सिंधुदुर्गातल्या निवडणुका भरकटू देणार नाही : मंत्री नितेश राणे

आम्ही विकासावर, सरकारच्या योजनांवर निवडणूक लढवत आहोत. त्या भरकटू देणार नाही.काल जो प्रकार घडला त्याबाबत निवडणूक आयोग निर्णय घेईल, पोलिस चौकशी करतील. ही चौकशी नि:पक्षपाती होईल. हीच नव्हे, तर यापुढे तीन चार दिवसांत ज्या तक्रारी होतील त्याचीही नि:पक्षपाती चौकशी होईल, अशी प्रतिक्रिया सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, ‌‘हमाम मे सब नंगे होते है,‌’ प्रत्येकाला आरोप करण्याचे अधिकार आहेत. परंतु, केवळ विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही निवडणुका लढवणार आहोत. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर जो आरोप आहे तो राजकीय आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT