Ramesh Mhatre : सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन रद्द झाल्यानंतर नगरसेवक रमेश म्हात्रेंसह चौघांची रवानगी आधारवाडी कारागृहात! 
ठाणे

Ramesh Mhatre : सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन रद्द झाल्यानंतर नगरसेवक रमेश म्हात्रेंसह चौघांची रवानगी आधारवाडी कारागृहात!

शास्त्रीनगर रूग्णालय हिंसाचार प्रकरण, डॉक्टर्स/परिचारिका हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट, कल्याण न्यायालयातून चौघांची रवानगी थेट कारागृहात

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : डोंबिवलीतील बहुचर्चित शास्त्रीनगर रुग्णालयामधील डॉक्टर्स आणि परिचारिकांना मारहाण केल्याच्या प्रकरणात रविवारी मोठी आणि खळबळजनक घडामोड घडली आहे. या प्रकरणातील आरोपी असलेले शिवसेनेच्या शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या तीन साथीदारांचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर रविवारी या चौघांनाही कल्याण न्यायालयात हजर व्हावे लागले. न्यायालयात हजर होताच त्यांची थेट आधारवाडी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

  या प्रकरणाचा मागोवा घेतला असता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात सोमवारी ६ जुलै रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास एका गर्भवती रुग्णाच्या उपचारावरून वाद झाला होता. या वादाचे पर्यावसान हिंसाचारात झाले आणि नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या साथीदारांवर ड्युटीवर कार्यरत असलेल्या परिचारिकांसह डॉ. सृष्टी बावीस्कर आणि डॉ. वैभव साळुंखे यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.

या घटनेमुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली होती आणि डॉक्टरांच्या संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या साथीदारांनी न्यायालयाकडून जामीन मिळवला होता आणि ते जामिनावर बाहेर होते. मात्र फिर्यादी डॉक्टरच्यावतीने या जामीन आदेशाला वरिष्ठ न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले आणि सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह चौघांचाही जामीन रद्द करण्याचा महत्वपूर्ण आदेश दिला.

   सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रविवारी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांचे तीन साथीदार कल्याण जिल्हा न्यायालयात न्यायाधीश संतोष आगे यांच्या कोर्टात हजर झाले. यावेळी न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेत चौघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयाच्या आदेशानंतर उपस्थित असलेल्या पोलिसांनी या चौघांना ताब्यात घेऊन थेट आधारवाडी कारागृहात रवाना केले आहे. एकीकडे या कारवाईमुळे कल्याण-डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे, तर दुसरीकडे वैद्यकीय क्षेत्राने न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT