ठाणे : पुढारी वृत्तसेवा; बदलापूरसारख्या सर्व गोष्टी अंगावर घेऊ नका, असा इशारा मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाणे पोलिसांना दिला आहे. आरोपी कोणत्याही पक्षाचा असो, त्याला पंखाखाली घेऊ नका असा सल्लादेखील ठाकरे यांनी राजकीय पक्षांना दिला आहे. टोलमुक्तीचा निर्णय हे मनसैनिकांच्याच आंदोलनाचे यश असल्याचे सांगत त्यांनी यावेळी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचेही यावेळी कौतुक केले.
शुक्रवारी ठाण्यात आलेल्या राज ठाकरे यांनी ठाण्यातील विनयभंग प्रकरणात ठाणे नगर पोलीस ठाण्यात जाऊन भेट घेतली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे पुढे म्हणाले,माझं पोलिसांशी बोलणं झालं, मी त्यांना हेच सांगितलं बदलापूर सारखं सगळ्या गोष्टी तुम्ही अंगावर घेऊ नका. अशा प्रकारची विनयभंगाची केस झाल्यानंतर अशा लोकांना जमीन मिळतो कसा हेच मला कळत नाही? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लहान वाहनांना टोलमुक्तीचा निर्णय जाहीर करून नागरिकांना खुश करण्याचा प्रयन्त केला असला तरी,टोलमुक्ती हे मनसैनिकांच्याच आंदोलनाचे यश असल्याचे राज ठाकरे म्हणाले. याबद्दल त्यांनी मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे देखील कौतुक केले आहे.टोलमुक्तीसाठी आंदोलन करणाऱ्यांच्या केसेस मागे घेतल्या पाहिजे. तो काय घरचा सत्यनारायण होता का आमच्या लोकांसाठी म्हणून केलेली गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. मला वाटतं आज सगळेच आनंदी असतील. इतकी वर्ष जी काय टोलधाड पडली होती त्याला डकैती म्हणता येईल. किती पैसे आले किती जमा झाले कोणाकडे आले काय झालं कशाचाच कशाला पत्ता नव्हता. इतक्या वर्षांच्या आमच्या आंदोलनाला हे यश मिळालं आहे. त्याबद्दल माझ्या सर्व मंसैनिकांचे अभिनंदन तेव्हा ही केलं आताही करत असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघासह ठाण्यातील चारही मतदार संघात उमेदवार उभे करण्याबाबत राज ठाकरे काही तरी भूमिका मांडतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र विधानसभा निवडणुकीवर बोलणे राज ठाकरे यांनी टाळले. मला अस वाटतं तुमचे दोन विषय होते मी दोन विषय बोललो आहे. बाकी पत्रकार परिषद घेऊन बोलेन असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
ठाण्यात आले कि मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे हे मामलेदार मिसळचा आस्वाद आवर्जून घेतात. यावेळी देखील त्यांनी आपल्या कुटुंबासमवेत मामलेदार मिसळपावचा आस्वाद घेतला. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह मनसेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी पदाधिकऱ्यांसोबत गप्पा रंगल्याचेही पाहायला मिळाले.