ठाणे : लोकल, मेल-एक्सप्रेस प्रवासादरम्यान प्रवासी बिनदिक्कतपणे पान-गुटखा-तंबाखू खातात आणि सर्रासपणे एक्सप्रेसचे दरवाजे, भिंती, पुलाच्या कोपऱ्यात, रुळांवर, प्लॅटफॉर्मच्या कडेला, भिंतीच्या तळाशी थुंकतात. त्यामुळे रेल्वेचा परिसर अस्वच्छ होऊन सगळीकडे घाण पसरल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो आहे. शिवाय प्रवाशांनी केलेली ही घाण रेल्वेच्या सफाई कर्मचाऱ्यांना हाताने साफ करावी लागते. रेल्वे वर्षाला अशी घाण साफ करण्यासाठी तब्बल १२ हजार कोटी रुपये खर्च करत आहे. (Railways have to spend about 12 thousand crores of rupees every year for such things like the dirt of those who eat Gutka and spit it out)
संपूर्ण भारतीय रेल्वेत दिवसभरात अडीच ते तीन कोटी प्रवासी प्रवास करतात. मुंबईच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर दिवसाला सुमारे ६५ ते ६७ लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवासी प्रवासादरम्यान पान-गुटखा तंबाखू खाऊन सर्रासपणे कुठेही धुंकतात. याचा मोठा फटका रेल्वेला बसतो. तसेच रेल्वेचा परिसरही घाण होतो. शिवाय ही घाण स्वच्छ करण्यासाठी रेल्वेला अतिरिक्त मनुष्यबळाची मदत घ्यावी लागते. रेल्वेकडे कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने साफसफाईकरिता कंत्राददाराची नियुक्ती केली जाते. गुटख्याचे डाग साफ करण्यासाठी रेल्वेला करोडो रुपये खर्च करावे लागतात.
देशात गुटखा, पान मसाल्याची बाजारपेठ तब्बल ४५ हजार कोटी रुपयांची आहे. त्यातून सरकारला १२ हजार कोटींचे उत्पन्न मिळते आणि हे १२ हजार कोटी रेल्वेला स्वच्छतेवर खर्च करावे लागतात. म्हणजेच पान-तंबाखू- गुटखा खाऊन थुंकलेले डाग साफ करण्यासाठी इतकी मोठी रक्कम खर्ची पडते. याशिवाय पान मसाला खावून धुंकू नका अशा जाहिरातींवर रेल्वे प्रशासनाकडून खर्च होतो तो वेगळाच.
कंत्राटदाराद्वारे रोजंदारीवर कर्मचारी स्वच्छतेचे काम करतात. या कर्मचाऱ्यांना सर्वच सोयी-सुविधा पुरविल्या जात नाहीत. त्यामुळे त्यांना आपल्या हाताने पान-गुटखा तंबाखू खाऊन प्रवाशांनी केलेली घाण साफ करावी लागते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
काही वर्षांपूर्वी रेल्वेने स्पिटून वेडिंग मशिन लावण्याचा विचार केला होता. थुंकण्याची पिशवी कोणीही आपल्या खिशात सहजपणे ठेवू शकतो. थुंकण्याचा पाऊच बायोडिग्रेडेबल असून तो १५-२० वेळा वापरला जाऊ शकतो. थुंकी त्या पाऊचमध्ये गेल्यानंतर त्याचे एका वेगळ्या पदार्थात रुपांतर होते. वापरुन झाल्यानंतर हा पाऊचकचरा कुंडीत फेकला तरी चालतो. परंतु मुंबईतील अद्याप कोणत्याही स्थानकात स्पिटून वेंडिग मशिन लावलेले नाही.