शहापूर ते शिर्डी रेल्वेमार्ग सर्वेक्षणाचा प्रस्ताव राज्य शासनाने करावा, यासाठी आमदार डॉ. किरण लहामटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत ही मागणी केली Pudhari News Network
ठाणे

Railway News | शहापुर-शिर्डी रेल्वेमार्ग प्रस्ताव शासनाने करावा

आमदार किरण लहामटे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

पुढारी वृत्तसेवा

डोळखांब : दिनेश कांबळे

तालुक्यातून जाणार्‍या शहापूर ते शिर्डी रेल्वेमार्ग सर्वेक्षणाचा प्रस्ताव राज्य शासनाने करावा, यासाठी आमदार डॉ. किरण लहामटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत ही मागणी केली. दोघांकडूनही या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती आमदार लहामटे यांनी दै.पुढारीशी बोलताना दिली.

अकोले तालुक्याला रेल्वेने देशाच्या अन्य भागाशी जोडण्यासाठी शहापूर (जि. ठाणे) डोळखांब, भंडारदरा, अकोले, संगमनेर, शिर्डी, साईनगर असा रेल्वेमार्ग व्हावा, अशी तालुक्यातील जनतेची अनेक वर्षांची मागणी आहे. राज्यात जे नवीन रेल्वेमार्ग होतात त्याचा निम्मा खर्च राज्य शासन करीत असते. त्यामुळे रेल्वेकडे राज्य शासनामार्फत प्रस्ताव जाणे गरजेचे असते. आमदार डॉ.किरण लहामटे यांनी या संदर्भात नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व त्यांच्याकडे सर्वेक्षण होणेसाठी राज्य शासनाने रेल्वेकडे प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी पत्राद्वारे केली. मुख्यमंत्र्यांनी परिवहन विभागाच्या अपर मुख्य सचिवांना याबाबत पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

मध्य रेल्वेवरील आसनगाव (शहापूर) ते साईनगर शिर्डी असा रेल्वेमार्ग झाल्यास अकोले तालुका थेट मुंबईशी रेल्वेने जोडला जाणार आहे. भाजीपाला, दूध, फुले, अन्य शेतीमाल यांना मुंबईची बाजारपेठ उपलब्ध होईल. नाशवंत माल वेळेत पोहचेल. याशिवाय भंडारदरा धरण, सांदण दरी, कळसूबाई, हरिश्चंद्रगड, रतनगड यांसारखे गडकिल्ले, पुरातन मंदिरे अशी अनेक पर्यटनस्थळे आहेत. रेल्वे झाल्यास पर्यटकांची संख्या देखील वाढेल. शिर्डीला येणारे अनेक भाविकही तालुक्यात सहजपणे येऊ शकतील. पर्यटन उद्योग वाढून व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. यावरून रेल्वेची आवश्यकता दिलेल्या पत्रातून डॉ. लहामटे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

कसारा घाटालाही एक पर्यायी मार्ग

मध्य रेल्वेवरील आसनगाव स्थानकातून हा मार्ग सुरू होईल आणि शहापूर, अकोले तालुक्याच्या आदिवासी भागातून हा मार्ग जाणार आहे. तसेच असा मार्ग झाल्यास कसारा घाटालाही एक पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. उपमुखंमंत्री अजित पवार यांच्याकडेही अशीच मागणी करण्यात आली आहे. तसेच पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गात कोणताही बदल करू नये, मूळ मार्गच कायम ठेवावा, अशी मागणीही त्यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तर शहापुरचे आमदार दौलत दरोडा यांनी देखील मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT