उल्हासनगर : कल्याण-बदलापूर लोहमार्गावर तिसर्या आणि चौथा मार्गिकेचे काम रेल्वेने हाती घेतले आहे. यासाठी विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक शेजारील 34 घरांवर कडक पोलिस बंदोबस्तात रेल्वे प्रशासनाने तोडक कारवाई केली. बाधित झालेल्या सदनिका धारकांना यापूर्वीच रेल्वेने पनवेल येथे इमारतीत पक्के घर दिले आहे.
वाढत्या लोकसंख्येमुळे दिवसेंदिवस लोकलमध्ये गर्दी देखील वाढत आहे. या वाढत्या गर्दीमुळे अपघातात ही वाढ होत आहे. ही बाब लक्षात घेऊन कल्याण ते बदलापूर दरम्यान रेल्वेने तिसरी आणि चौथी मार्गीका टाकण्याचे काम सुरू केले आहे. यासाठी रेल्वेने यापूर्वीच विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाशेजारी पार्किंग हटवत तिथे पादचारी पूल बांधण्याचे काम सुरू केले आहे. हे काम सुरू असतानाच उल्हासनगरच्या बाजूने जाणार्या मार्गीकेत विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाच्या तिकीट खिडकीच्या मागच्या बाजूला असलेल्या वस्तीतील तब्बल 34 घरे बाधित होत होत.
सहा महिन्यांपूर्वीच या घरांचे सर्वेक्षण रेल्वे प्रशासनामार्फत करण्यात आले. या बाधित घरात राहणार्या सदनिकाधारांना नोटीसा बजावत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या सदनिकाधारकांना पनवेल येथे घर देण्यात आले आहे. असे असले तरी काही कुटुंब ही विरोधाच्या भूमिकेत होती. ही बाब लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने मध्यवर्ती पोलीस ठाण्यातील जवळपास 100 कर्मचारी आणि अधिकारी, रेल्वे सुरक्षा दलाचे जवान, शेकडो खाजगी मजूर आणि दोन जेसीबीच्या सहाय्याने सोमवारी सकाळी बाधित घरांवर कारवाई केली. यावेळी स्थानिकांनी विरोध केला असता त्याला न जुमानता कारवाई चालू ठेवली.