बदलापूर : कुळगांव बदलापूर नगरपरिषदेच्या रिक्त झालेल्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपचे प्रवीण राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रवीण राऊत यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांचा नगराध्यक्षा रुचिता घोरपडे व उपनगराध्यक्षा प्रियंका दामले यांनी सत्कार केला. तसेच भाजपा राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी ही त्यांचा सन्मान केला. यानंतर एक जंगी मिरवणूक कुळगांव बदलापूर नगरपालिका कार्यालयापासून प्रवीण राऊत यांच्या घरापर्यंत काढण्यात आली. यावेळी प्रवीण राऊत यांचे समर्थक मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते.
प्रवीण राऊत हे गेली अनेक वर्ष शिवसेनेचे काम करत होते. मात्र सर्वसाधारण निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर स्वीकृत सदस्य पदी त्यांची निवड होईल अशी अपेक्षा होती. मात्र नगरसेवक पदी निवड न झाल्याने त्यांनी शिवसेनेचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना भाजपाने स्वीकृत सदस्य पदासाठी नियुक्त केले. बुधवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत त्यांची या नगरसेवकपदी वर्णी लागली. बहुजन युवा नेतृत्व अशी प्रवीण राऊत यांची ठाणे जिल्ह्यात एक वेगळी ओळख आहे.
बहुजन समाजातील तरुण तरुणांसाठी ते विशेष कार्य करत असतात. इतकेच नाही तर त्यांचा शिरगांव आणि परिसरात प्रबल्य असून त्यांच्या पत्नी शीतल राऊत आणि वहिनी विजया राऊत या परिसरातून नगरसेविका म्हणून निवडूनही आल्या आहेत. तसेच बदलापुरात “भीम महोत्सवाचे” आयोजन ते गेले अनेक वर्ष करत असून या माध्यमातून बहुजन समाजातील तरुणांना आणि कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याचे काम प्रवीण राऊत यांच्या माध्यमातून होत असल्याने त्यांच्या स्वीकृत सदस्यपदी निवड झाल्याचा व त्यांच्या राजकीय अनुभवाचा भारतीय जनता पक्षाला फायदा होईल असे भाजपा गटनते शरद तेली यांनी अभिनंदन करताना सांगितले. एकूणच प्रवीण राऊत यांच्या निवडीनंतर भाजप आणि प्रवीण राऊत यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.