ठाणे: स्व.प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला २३ दिवस झालेले आहेत. या हत्येमागे राजेंद्र शिंदे आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे असल्याचा वारंवार सांगत असून हत्येच्या वेळी हेल्मेटधारी आरोपी हा अमितसिंग नसून राजेंद्र शिंदे असल्याचा सनसनाटी आरोप आणि ठोस दावा राम पूर्णेकर यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन केला.
यावेळी आरोपींना प्रशिक्षण दिल्याचा व्हिडीओ सादर केला. यामुळे ठाणे एसआयटी टीमचा तपास संशयाच्या धुक्यात आल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे राजेंद्र शिंदे यांच्या अडचणीत वाढ होत असल्याची चिन्हे दिसत आहेत. बुधवारी दुपारनंतर एसआयटी टीम गुन्ह्यात वापरलेली हत्यारे शोधण्यासाठी आरोपी संतोष कनोजिया उर्फ टल्ली याला घेऊन कर्नाळा जंगलात रवाना झालेली आहे.
स्व. प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात अनेक गौप्यस्फोट करण्यात येत आहेत. हत्येच्या २३ दिवसानंतर अद्यापही तपास हा अपुरा आहे. तर दुसरीकडे एसआयटी टीमच्या खंडणी विरोधी पथकाने राजेंद्र शिंदे यांची सलग पाचव्या दिवशी सहा तास चौकशी करून घरी सोडण्यात आलेले आहे. चौकशीत आरोपींच्या समोरासमोर चौकशी करण्यात आली आहे.
त्यांना चौकशीसाठी बोलविण्यात येणार आहे. स्व. प्रदीप पूर्णेकर याच्या हत्येत वापरलेले शस्त्रे शोधण्यासाठी ठाणे पोलिसांची एसआयटी टीम संतोष कनोजिया उर्फ टल्ली याला घेऊन कर्नाळा जंगलाकडे रवाना झाले.
यापूर्वीही कर्नाळा जंगलातून पोलिसांनी निखिल यादव आणि नितेश पवार या दोघांना अटक केली तेव्हा दुसऱ्या दिवशी एक पिस्टल आणि मोबाईल कर्नाळा जंगलातून हस्तगत केला. आता आरोपी टल्ली याला कर्नाळा जंगलात नेऊन हत्याराचा शोध घेण्यात येत आहे.