Pradeep Purnekar Death Case pudhari
ठाणे

Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकरांवर गोळी झाडण्यात आलेले पिस्तुल कर्नाळा जंगलातून जप्त!

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण, आरोपी निखिल यादव व नितेश पवार या दोघांनी हे पिस्तुल कर्नाळा जंगलात दिले होते फेकून

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : ठाण्यातील उबठा पक्षाचे विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मारेकऱ्यांनी वापरलेले पिस्तुल पोलिसांनी कर्नाळा येथील जंगलातून जप्त केले आहे. पूर्णेकर यांची हत्या करणारे अटकेतील आरोपी निखिल यादव व नितेश पवार या दोघांनी हे पिस्तुल कर्नाळा येथील जंगलात फेकून दिले होते. अशी माहिती तपासातून समोर आल्यानंतर या घटनेचा तपास करीत असलेल्या एसआयटी पथकाने दोघा आरोपींनी सोबत घेऊन मंगळवारी सायंकाळी कर्नाळा जंगल गाठले. यावेळी निखिल यादव याचा मोबाईल देखील जंगलातून जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील तपासात हा मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागल्याचे मानले जात आहे.

ठाण्यातील उबठा पक्षाचे विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला आठवडा पूर्ण होत आला तरी या गुन्ह्याचा उलगडा झालेला नाही. या गुन्ह्यातील पप्या शिंदे, निखिल यादव व नितेश पवार या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि एक अज्ञात मारेकरी अद्याप देखील फरार आहेत.

दरम्यान, या घटनेचा तपास करीत असलेल्या एसआयटी टीमने शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावरील कर्नाळा येथील जंगला जवळील एका डेअरी फर्म मधून निखिल यादव व नितेश पवार दोघा मारेकऱ्यांना अटक केली होती. निखिल यादव याने पूर्णेकरांवर पिस्तूलातून गोळ्या झाडल्या होत्या. तर नितेश पवार याने त्यांच्या मानेवर व पाठीवर अत्यंत निर्घृणपणे वार केले होते. अटक करण्यात आलेल्या दोघांनी हत्येसाठी वापरलेले पिस्तुल व धारदार हत्यार कर्नाळा येथील जंगलात फेकून दिल्याची माहिती तपासादरम्यान दिली होती. त्यानुसार एसआयटी पथक मंगळवारी सायंकाळी दोघा आरोपींना घेऊन कर्नाळा येथील जंगलात पोहचले.

यावेळी कर्नाळा येथील जंगलातून एक पिस्तुल व आरोपीचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला. तर खूप शोध घेऊन देखील धारदार हत्यार सापडले नाही. पोलिसांनी जप्त केलेले पिस्तुल व मोबाईल फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात येणार असून याच पिस्तूलातून गोळी झाडण्यात अली होती का याचा उलगडा फॉरेन्सिक तपासणी अंती स्पष्ट होणार आहे. तर आरोपीच्या मोबाईल मधून देखील अनेक बाबींचा उलगडा होण्यास मदत होणार आहे अशी माहिती एसआयटी सूत्रांनी दिली. पूर्णेकर यांच्या हत्येला आठवडा पूर्ण होत आला तरी देखील या गुन्ह्यात वापरलेले हत्यार पोलिसांना मिळून येत नव्हते. मात्र आता पिस्तुल मिळून आल्याने हा या प्रकरणात मोठा पुरावा मानला जात आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपी पैकी नितेश पवार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तो प्रदीप पूर्णेकर यांच्या कार्यालयाजवळील एका वडापावच्या गाडीवर कामाला होता. तर पूर्णेकर हत्या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पथकाने पप्या शिंदे यास यापूर्वीच अटक केली आहे. या गुन्ह्यात एकूण पाच आरोपींचा सहभाग होता असे पोलीस तपासातून निष्पन्न झाले आहे.

त्यापैकी संतोष कनोजिया उर्फ टल्ली हाच या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार होता व तो अद्यापही फरार आहे. तर हल्यावेळी एक जण हेल्मेट घातलेला असल्याने त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. दोघा फरार आरोपींच्या शोधासाठी वेगवेगळी पथके ठिकठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. तसेच दोघा फरार आरोपी विरोधात ठाणे पोलिसांनी लूकआउट नोटीस जारी केली आहे. राज्याबाहेरील सर्व रेल्वे स्थानक व राज्याच्या सीमा तपासणी नाक्यांवर या दोघांबाबत माहिती देण्यात आली आहे.

दुचाकी सोडून कारने पलायन

पूर्णेकर यांची हत्या केल्यानंतर पाचही आरोपींनी आपल्या दुचाकी समतानगर येथे सोडून दिल्या होत्या. त्यानंतर हे सर्व आरोपी अल्टो कारने कळवा मुंब्रा बायपास मार्गे कल्याण फाटा येथे गेले. कल्याण फाटा येथे निखिल यादव व नितेश पवार हे दोघेही कार मधून उतरले आणि गोव्याच्या दिशेने फरार झाले. तर संतोष कनोजिया व हेल्मेटधारी असे दोघे आरोपी कारने बदलापूरच्या दिशेने पळून गेल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT