Pradeep Purnekar case Pudghari
ठाणे

Pradeep Purnekar case: प्रदीप पूर्णेकर यांना न्याय मिळावा; ठाण्यात सर्वपक्षीय कँडल मार्च

बाजारातून निघालेल्या मूक मोर्चात समाजमन सुन्न

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: एकीकडे बाजारात दिवाळीसाठी गर्दी उसळली असताना दुसरीकडे महिना उलटला तरी प्रदीप पूर्णेकर हत्येतील मुख्य सूत्रधारांना अटक झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या पूर्णेकर कुटुंबियांसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आज सायंकाळी ठाण्यात मेणबत्ती मोर्चा काढला. जांभळी नाका येथून निघालेला मोर्च्याची सांगता कै. आनंद दिघे यांच्या स्मारकापाशी झाली.

शिवसेना उबाठा गटाचे विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याप्रकरणी पाच आपोरींना जेरबंद करण्यात आलेले आहे. मात्र या हत्येचा मुख्य सूत्रधार हे माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्याचे पती राजेंद्र शिंदे असल्याचा आरोप पूर्णेकर कुटुंबियांनी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मात्र ५० तासांपेक्षा अधिकची चौकशी आणि १६ व्हिडीओचे पुरावे देऊनही राजेंद्र शिंदे यांना पोलीस अटक करीत नसून त्यांना राजकीय दबावापोटी संरक्षण दिले जात असल्याचा आरोप पूर्णेकर कुटूंबियांनी केला आहे.

तसेच सर्व पक्षीय नेत्यांनी देखील शिंदे दाम्पत्यांना अटक होण्यासाठी आंदोलने सुरु केली आहेत. खुनाच्या घटनेला महिना उलटला तरी कारवाई होत नसल्याने शांततेच्या मार्गाने आंदोलने केली जात आहेत. आज सकाळी मीनाक्षी शिंदे यांनी पोलीस आयुक्तांना भेटून पूर्णेकर यांच्या कुटुंबियांना संरक्षण द्यावे, विरोधी पक्षातील काही नेत्यांकडून धोका असल्याचा संशय व्यक्त करीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी केली जात असल्याचा आरोप केला.

खुनाप्रकरणी चौकशी सुरु असताना मीनाक्षी शिंदे यांच्यासाठी पोलीस आयुक्तालयात खास पोलीस बंदोबस्त ठेवून प्रवेशद्वार बंद ठेवल्याचे दिसून आले. त्यानंतर सायंकाळी पूर्णेकर यांचे बंधू जयनाथ पूर्णेकर, मुलगा राम पूर्णेकर, माजी खासदार राजन विचारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज प्रधान, काँग्रेस शहर अध्यक्ष राहुल पिंगळे, माजी अध्यक्ष ऍड. विक्रांत चव्हाण यांच्यासह सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते , आगरी कोळी समाजातील कार्यकर्ते, हितचिंतक मेणबत्ती मोर्चामध्ये सहभागी झाले होते. जांभळी नाक्यावरील कै. आनंद दिघे टॉवर जवळून सुरु झालेला मोर्चा खारटन रोडवरून दिघे यांच्या शक्तीस्थळपर्यन्त गेला. त्याठिकाणी मोर्चेची सांगता झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT