ठाणे : प्रदीप पूर्णेकर हत्याकांडाच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या तरुणांची धरपकड करण्यासाठी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबविले. या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये दलित तरुणांना पकडून अमानुष मारहाण करण्यात आली. त्याच्या निषेधार्थ माजी खासदार राजन विचारे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली कापूरबावडी पोलीस ठाण्यासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले.
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी घोडबंदर रोड परिसरात आंदोलन करण्यात आले होते. या घटनेनंतर काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, पोलीस ठाण्यात नेल्यानंतर त्यांना विवस्त्र करून पट्ट्याने मारहाण करण्यात आली. तसेच अर्जुन पुंडगे आणि संकेत कदम या दोघांच्या गुप्तांगावरही मारहाण केली गेली. ही अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात नगरसेवक यासीन कुरेशी, शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख केदार दिघे, गटनेते अभिजीत पवार, माजी नगरसेवक विक्रांत चव्हाण, संजय तरे, प्रकाश पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आंदोलकांनी पोलिसांच्या दहशतीचा जोरदार निषेध केला. "मारकुट्या पोलिसांना अटक करा, बेकायदेशीर कोम्बिंग ऑपरेशन करणाऱ्या पोलिसांना निलंबित करा, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना बडतर्फ करा," अशा घोषणा या वेळी आंदोलकांनी दिल्या. याप्रसंगी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलीस ठाण्यात जाण्यापासून आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केल्याने आंदोलकांनी पोलीस ठाण्याच्या दारातच काही काळ ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजी केली.
त्यानंतर पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केली. या चर्चेत पोलीस उपायुक्तांनी कारवाईचे आश्वासन दिले. तसेच, "तपास आपण स्वतः करीत असून सांगळे आणि राठोड या दोन हवालदारांची बदली करण्यात आली आहे," असे कदम यांनी शिष्टमंडळास सांगितले.
दरम्यान, मनोज प्रधान यांनी या दमनशाहीचा तीव्र निषेध केला. ते म्हणाले, "लोकशाहीमध्ये आंदोलन करणे हा भारतीय नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. आंदोलनात काही गैरकृत्य घडल्यास कायदेशीर मार्गाने कारवाई करावी. मात्र, यापुढे कुणी आंदोलनच करू नये म्हणून आंदोलकांना बेदम मारहाण करणे ही लोकशाही आहे का? मारहाण झालेले तरुण हे दलित आहेत, त्यामुळे संबंधित पोलिसांवर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करावा, हीच आमची मुख्य मागणी आहे."
मनसेचे अविनाश जाधव म्हणाले की, "या गुन्ह्यातील पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र, त्या गुन्हेगारांवर थर्ड डिग्री वापरली नाही आणि शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर अशी अमानुष कृती करण्यात आली. आम्ही दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी केली आहे; ही कारवाई न झाल्यास आंदोलन सुरूच राहील. ज्या मुलांवर अत्याचार झाले आहेत, त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत संबंधितांवर गुन्हे दाखल झाले नाहीत, तर हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल."