Pradeep Purnekar Case pudhari photo
ठाणे

Pradeep Purnekar Case: पूर्णेकर कुटुंबीयांनी ठाणे पोलिसांना सादर केले नवे पुरावे; तपास समाधानकारक नसल्याने उच्च न्यायालयात मागितली दाद

दोन महिन्यांपासून तपास सुरू असला तरी प्रगतीची माहिती मिळत नसल्याची कुटुंबीयांची खंत; उच्च न्यायालयातही मागितली दाद

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या पत्नी विजेता पूर्णेकर यांनी आज पोलिसांकडे महत्त्वाचे पुरावे सादर केले. गेल्या दोन महिन्यांपासून तपास सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी तपास नेमका कुठपर्यंत पोहोचला आहे, याची माहिती कुटुंबीयांना मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

आता सर्व पुरावे पोलिसांना दिले असून, न्याय मिळण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तपासाबाबत समाधानकारक माहिती मिळत नसल्याने कुटुंबीयांना उच्च न्यायालयातही दाद मागावी लागल्याचे पूर्णेकर कुटुंबीयांनी सांगितले.

पूर्णेकर कुटुंबीयांकडे असलेले पुरावे यापूर्वी पोलिसांना दिले तर आताही नवे पुरावे पूर्णेकर कुटुंबीयांनी ठाणे गुन्हे शाखेच्या कार्यालयात जाऊन दिले. योग्य वेळ आल्यावर ते काय आहेत, हे तुम्हालाही दाखवू. आता आम्हाला केवळ न्यायाची अपेक्षा आहे, असा इशारा विजेता पूर्णेकर यांनी दिला.

हत्येच्या पार्श्वभूमी वर आपल्याला केवळ एका व्यक्तीकडून धोका होता आणि त्याची माहिती सर्वांना असल्याचा दावा करत त्यांनी मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्या नावाचा उल्लेख केला. प्रत्येक वेळी तीच नावे ओरडून सांगण्याची गरज नाही. मात्र, आम्ही शेवटपर्यंत या नावांवर ठाम राहणार,'असा निर्धारही विजेता पूर्णेकर यांनी व्यक्त केला.

प्रदीप पूर्णेकर यांची पुतणी खुशबू पूर्णेकर यांनीही तपासाबाबत नाराजी व्यक्त केली. या हत्येच्या तपासाशी संबंधित काही व्हीडिओंचा संदर्भ देताना त्यांनी सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्ती आणि वाहनांच्या हालचालींबाबत माहिती दिली.

त्यांच्या दाव्यानुसार, एका व्हीडिओमध्ये निखिल यादव चालत येताना दिसतो, तर पप्प्या शिंदे दुचाकी वरून एकटाच जाताना दिसतो. त्यानंतर दुचाकीवर दुसरी व्यक्ती असल्याचेही त्यांनी सांगितले. हेल्मेट घातलेली व्यक्ती राजेंद्र शिंदे असल्याचा दावा करत, या संदर्भातील माहिती तपास यंत्रणांसमोर मांडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आता प्रतीक्षा करण्‍याशिवाय पर्याय नाही...

तपासाची प्रगती कळत नसल्यामुळेच पुढील न्यायालयीन मार्गाचा अवलंब करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. आता तपासाच्या अंतिम निष्कर्षाची प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नसल्याचेही त्या म्हणाल्या. पोलिसांकडे पुरावे सादर करण्यात आले असले, तरी त्यातून तपासाला कोणती दिशा मिळते आणि पुढे काय कारवाई होते, याकडे पूर्णेकर कुटुंबीयांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT