खड्ड्यांमुळे एकविस दिवस मृत्युशी झुंज देत असलेल्या रोहन राजेंद्र शिंगरे या तरूणाचा शुक्रवारी (दि.15) अंत झाला. Pudhari News Network
ठाणे

Potholes killed People : कल्याण-शिळ महामार्गातील खड्ड्यांनी घेतला मानवी बळी

कल्याणकर दुचाकीस्वाराची 21 दिवस मृत्यूशी झुंज देत अखेर

पुढारी वृत्तसेवा

ठळक मुद्दे

  • मानवी बळी घेणारा कल्याण-शिळ महामार्ग वादाच्या भोवर्‍यात

  • खड्ड्यामुळे खाली पडलेल्या दुचाकीस्वाराला भरधाव ट्रकने फरफटत नेले

  • 21 दिवस मृत्युशी झुंज देत असलेल्या या तरूणाचा खड्ड्यामुळे अंत

डोंबिवली (ठाणे) : वाहतूककोंडी आणि खड्ड्यांमुळे चर्चेनंतर मानवी बळी घेणारा कल्याण-शिळ महामार्ग वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. या मार्गावरील पिंपळेश्वर हॉटेल जवळच्या खड्ड्यात कल्याणमध्ये राहणारा एका नोकरदार तरूण दुचाकीसह जोरात आदळला. रस्त्यावर पडल्याने पाठीमागून भरधाव वेगात असलेला ट्रकच्या चाकात हात अडकल्याने या तरूणाला फरफटत नेले. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या या तरूणावर नवी मुंबईतील रूग्णालयात उपचार सुरू होते. अखेर एकविस दिवस मृत्युशी झुंज देत असलेल्या या तरूणाचा शुक्रवारी (दि.15) अंत झाला.

रोहन राजेंद्र शिंगरे (28) असे मृत तरुणाचे नाव असून या तरूणाच्या मृत्युने कल्याण-शिळ महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि जीवघेण्या खड्ड्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. रोहन शिंगरे हा तरूण कल्याण पश्चिमेतील रामबाग परिसरात आपल्या कुटुंबीयांसमवेत राहत होता. विशेष म्हणजे रोहन हा ज्येष्ठ शिवसैनिक राजेंद्र शिंगरे यांचा एकुलता एक मुलगा होता. या संदर्भात माजी महापौर वैजयंती गुजर-घोलप यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. रोहन शिंगरे हा नवीमुंबईतील वाशी येथे नोकरी करत होता. दररोज तो आपल्या कामाच्या ठिकाणी कल्याण-शिळ महामार्गावरून दुचाकीने ये-जा करत असे. गेल्या महिन्याच्या 23 तारखेला सकाळच्या सुमारास रोहन त्याच्या दुचाकीवरून वाशीला कामावर निघाला होता.

एमआयडीसीजवळील गॅलेक्सी हॉटेल ते पिंपळेश्वर हॉटेल दरम्यान रस्त्यावर पाण्याने भरलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने रोहन दुचाकीसह पडला. पाठीमागून भरधाव वेगात येत असलेला ट्रक रोहनच्या डाव्या हातावरून गेला. त्याचा हात ट्रकच्या चाकाजवळील हुकाला अडकल्याने तो ट्रकसोबत काही अंतरावर फरफटत गेला. एक हात निकामी झालेल्या रोहनला स्थानिकांनी तात्काळ जवळच्या खासगी रूग्णालयात दाखल केले. रोहनच्या कुटुंबीयांना रूग्णालयात धाव घेतली. परंतु प्रकृती अधिकच गंभीर असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रोहनला नवी मुंबईच्या सानपाडा येथील एका रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रोहनच्या डावा हात ट्रकखाली आल्याने डॉक्टरांनी त्याचा डाव हात काढला. मागील काही दिवसांपासून रोहनची प्रकृती ढासळू लागली. अखेर 15 ऑगस्ट रोजी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

स्ट्रक्चरल ऑडिटनुसार बांधकामात असंख्य दोष

या संदर्भात माजी आमदार तथा मनसेचे नेते राजू पाटील म्हणाले, कल्याण-शिळ महामार्गाच्या क्राँकीटीकरण कामाची गुणवत्ता व दर्जाच्या तपासणीसह केलेल्या कामाचे त्रयस्थ शासकीय संस्थेमार्फत ऑडीट करण्याकडे आपण तारांकीत प्रश्नाद्वारे राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानुसार महामंडळाने व्हिजेटीआय अर्थात मे. वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेची नियुक्ती केली. व्हिजेटीआयने या महामार्गाच्या क्राँकीटीकरण कामाच्या 21 किमी लांबीपैकी 10 किमी लांबीचे स्ट्रक्चरल ऑडीट करून त्याचा अहवाल महामंडळाला पाठवला. सदर अहवालात म्हटल्याप्रमाणे 10 किमी लांबीत एकूण सुमारे 13 हजार 320 पॅनल बनविण्यात आले आहेत. पैकी 30 पॅनल बदली करावयाचे असून 64 पॅनलमध्ये लहान तडे गेल्याचे आढळून आले आहेत. ते त्वरीत सुधारण्याची शिफारस व्हिजेटीआयकडून करण्यात आली. त्यानुसार महामंडळाने ठेकेदाराला सूचना दिल्या. 30 पैकी 13 पॅनल ठेकेदाराने बदलले. मात्र एवढे करूनही या रस्त्याच्या बांधकामाची गुणवत्ता खड्ड्यांतून दिसून येते. रोहन शिंगरे या तरूणाचा हकनाक बळी गेला हे दुर्दैवी आहे. या घटनेला जबाबदार असलेल्यांवर जबर कारवाई व्हायला हवी, अशी अपेक्षा राजू पाटील यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT