बदलापूर आंदोलनाबाबत जनप्रक्षोप उसळून संतप्त नागरिकांनी तब्बल सात तास रेल्वे रोको करून संपूर्ण देशाचे लक्ष वेधले pudhari news network
ठाणे

बदलापूरच्या उद्रेकाला पोलीस, शाळा व्यवस्थापन जबाबदार?

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : बदलापूरमधील आदर्श विद्यामंदिर मधील चार वर्षीय दोन चिमुरड्या मुलींवर झालेल्या अत्याचाराविरोधात जनप्रक्षोप उसळून संतप्त नागरिकांनी तब्बल सात तास रेल्वे रोको करून संपूर्ण देशाचे लक्ष वेधले. आता हे आंदोलन राजकीय प्रेरित असल्याची ओरड राज्य सरकारकडून केली जात आहे. मात्र या दंगलीला, आंदोलनाला शाळा व्यवस्थापन आणि स्थानिक पोलीस प्रशासनच जबाबदार असून पीडित मुलींच्या आईवडिलांची तक्रार नोंदवून पोलिसांनी वेळेत कारवाई केली असती तर हा उद्रेक झालाच नसता. दुर्दैवाने ठाणे जिल्ह्यात पोलिसांकडून तक्रारी नोंदविण्यास टाळाटाळ होत असल्याने जिल्ह्यातील नागरिक हताश झालेले आहेत.

कायद्यानुसार प्रथम तक्रार नोंदवून पुढील कारवाई करणे अपेक्षित असताना ठाणे जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यात तक्रारदारांना पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. मग तो गुन्हा कुठल्याही स्वरूपाचा असो. पोलीस ठाण्यात तक्रार देऊन येणार्‍या तक्रारदाराला चांगली वागणुकीसह त्याची प्रथम तक्रार नोंदवून घ्यावी, असे आदेश पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे आहेत. तरी देखील काही पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून घेण्यात टाळाटाळ केली जात आहे. राजकीय वरदहस्त असलेल्या व्यक्तींविरोधात तक्रार नोंदवून घेताना तक्रारदारालाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले जात. असाच प्रकार बदलापूर येथील दोन अल्पवयीन चिमुरड्या मुलींवर अत्याचार झाल्यानंतर घडल्याचे समोर आले आहे. शाळेतील कर्मचारी अक्षय शिंदे याने दोन मुलींवर अत्याचार केल्यानंतर त्याची तक्रार घेण्यास बदलापूर पोलिसांनी खूपच विलंब लावला. तब्बल 11 तास त्या मुलींच्या पालकांना पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. 13 ऑगस्ट रोजी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली नाही. शाळेच्या व्यवस्थापनाने देखील योग्य दखल घेऊन आरोपीविरोधात तक्रार दिली नाही. शाळेचे सीसीटीव्हीबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आरोपी आणि शाळा व्यवस्थापना विरोधात कारवाईची मागणी पीडित मुलींच्या आई-वडिलांकडून करण्यात आणि संतप्त नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र आश्वासनापलीकडे पोलिसांनी काहीच केले नाही.

20 ऑगस्ट उजाडले तरी पोलिसांनी कारवाई न केल्याने आंदोलनकर्त्यांनी शाळेवर मोर्चा काढला. या मोर्च्यात कोण होते, कोण कुठून आले होते, याची माहिती स्थानिक पोलिसांना असणारच. बाहेरून माणसे येऊन आंदोलन केले तर पोलीस यंत्रणा काय करीत होती? गुप्तचर विभाग काय करीत होते? यासारखे प्रश्न निर्माण होतात.

कुठलीही संस्था असो वा संघटना यांच्या बैठका, पत्रकार परिषदांमध्ये साध्या गणवेषात पोलीस पाठवून प्रत्येक गोष्टीवर, हालचालींवर लक्ष ठेवले जाते, मग बदलापूर येथील आंदोलनाची, जनप्रक्षोभाची पोलिसांना माहिती नसेल, हे नागरिकांना पचनी पडत नाही.

...तर हा उद्रेक झाला नसता

या शाळेवरील विश्वस्त मंडळ भाजपशी संबंधित असल्याने काही त्यांच्या विरोधकांनी फायदा उचलला असल्याचा आरोप सरकारकडून होत आहे. असे आंदोलन होण्यापूर्वी पोलिसांनी आणि शाळा व्यवस्थापनाने वेळेत कारवाई केली असती तर हा उद्रेक झाला नसता आणि पीडितेला योग्यवेळी न्याय मिळाला असता, अशी भावना बदलापूरमधील रहिवासी व्यक्त करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT