मिरा रोड : काशीमीरा येथील आर्केस्ट्रा बारमध्ये नृत्य आणि अश्लील नृत्यास बंदी असतानाही महिलांना नृत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी काशिगाव पोलिसांनी आर्केस्ट्रा बारवर छापा टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 19 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून 41,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी केलेल्या कारवाई -वरून मिरा भाईंदर शहरात रात्री उशिरापर्यंत बार व आर्केस्ट्रा बार हे सुरू असल्याचे दिसून येत आहे. 16 डिसेंबरच्या रात्री ते 17 डिसेंबरच्या पहाटेपर्यंत ही कारवाई करण्यात आली. काशिमिरा येथील आर्केस्ट्रा बारमध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या आस्थापनेचे मालक, चालक, मॅनेजर, सिंगर आणि वेटर्स यांनी संगनमत करून, बारमधील मुलींना अश्लील नृत्य करण्यास भाग पाडले आणि त्यांना प्रोत्साहित केले.
शासनाच्या कायदेशीर आदेशाचे उल्लंघन करत बार सुरू असल्यामुळे पोलिसांनी ही धडक कारवाई केली. या कारवाईत मालक, चालक, मॅनेजर, सिंगर आणि वेटर्स अशा एकूण 19 जणांवर काशीगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत 41,800 रुपये रोख आणि इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अन्वर शेख करत आहेत.