Thane | बारबालांसह 56 जणांवर फौजदारी कारवाई; छमछम बंद Pudhari file photo
ठाणे

Bars Raid : बारबालांसह 56 जणांवर फौजदारी कारवाई; छमछम बंद

कल्याण-शिळ महामार्गावरील बारवर पोलिसांची धाड

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण-शिळ महामार्गावरील बारवर पोलिसांनी धाड टाकत बारबालांसह 56 जणांवर फौजदारी कारवाई केली. काटई गावाजवळ मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बारवर पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या पथकातील कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी गणेशोत्सवाच्या धामधुमीत मध्यरात्रीच्या सुमारास धाड टाकली. या धाडीत 18 बारबाला तथा कथित नृत्यांगनांसह बारचा परमीटधारक, चालक, मॅनेजर, वेटर्स आणि नोटा उधळून नृत्यांगनांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देणार्‍या 29 ग्राहक अशा एकूण 56 जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.

मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या या बारमध्ये रात्री उशिरापर्यंत धिंगाणा सुरू असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. उपायुक्त झेंडे यांनी या तक्रारींची गंभीर दखल घेतली. उपायुक्तांनी स.पो.नि. प्रशांत आंधळे व पथकाला काटई गावच्या हद्दीतील बारवर कारवाई करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सपोनि प्रशांत आंधळे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास बारमध्ये अचानक एन्ट्री केली. त्यावेळी 18 कथित नृत्यांगना गाण्याच्या तालावर नाचत मद्यपींना भुरळ घालताना आढळून आल्या. त्यातील काही ग्राहक यावेळी नोटांची उधळण करताना आढळून आले.

पोलिसांच्या अचानक एन्ट्रीने तेथील सर्वांचीच पळापळ झाली. पोलिसांनी बारचे सर्व दरवाजे आतून बंद करून सर्वांना आहे त्या जागी बसण्याच्या सूचना दिल्या. यावेळी पोलिसांनी 18 बारबाला, 29 ग्राहक, 5 वेटर, सदर बारचा मालक संतोष पावशे (फरार आरोपी), चालक सतीश शेट्टी (फरार आरोपी), मॅनेजर रविंद्रा बगेरा (57), कॅशियर शिवकुमार बिरासदार (32), म्युझिक ऑपरेटर रोहन शेलार (30) अशा 56 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

2.36 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

या कारवाईत 13 हजार 730 रुपयांच्या रोकडसह वाद्यवृंद, लाईट्स असा 2 लाख 36 हजार 730 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

रहिवाशांतून समाधान

डीसीपी अतुल झेंडे यांच्या सूचनांनुसार कल्याण-शिळ महामार्गावरील रात्री उशिरापर्यंत चालणार्‍या चार-पाच बारवर यापूर्वी धाडी टाकण्यात आल्या. डीसीपी झेंडे आणि त्यांच्या खास पथकाकडून तथापि पोलीस परिमंडळ 3 हद्दीत रात्री उशिरापर्यंत चालणार्‍या बारवर कठोर कारवाईचा बडगा उगारला जात असल्याने अशा बारच्या परिसरात राहणार्‍या रहिवाशांसह व्यसनाधीन झालेल्यांच्या कुटुंबीयांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT