ठाणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शालेय वर्गमित्र असल्याचा दावा करणाऱ्या ८१ वर्षीय वृद्धाला एका मोठ्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात अखेर दिलासा मिळाला आहे. पंतप्रधानांची भेट घेऊन सीबीआय चौकशीची मागणी केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच भाजप आमदाराशी संबंधित विकासक कंपनीने या प्रकरणातून पूर्णपणे माघार घेतली.
मिरा रोड येथील रहिवासी असगरअली वोहरा यांनी गुजरातच्या वडनगर येथील बी. एन. हायस्कूलमध्ये नरेंद्र मोदी यांच्यासोबत शिक्षण घेतल्याचे सांगितले आहे.
वोहरा यांच्या मते, त्यांनी १९८९ मध्ये भाईंदर पूर्व येथील नवघर भागात २,८१० चौरस मीटरचा मोक्याचा भूखंड खरेदी केला होता. २०११ मध्ये 'स्वयं बिल्डर्स' आणि 'सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन' या कंपन्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांच्या जमिनीवर ताबा मिळवला, असा आरोप वोहरा यांनी केला होता. या दोन्ही कंपन्या भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्याशी संबंधित असल्याचे त्यांनी नमूद केले होते.
पंतप्रधानांची भेट अन् चक्रे वेगाने फिरली
न्यायासाठी अनेक वर्षे लढा दिल्यानंतर वोहरा यांनी ८ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांनी या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची विनंती केली होती. या भेटीनंतर प्रशासकीय पातळीवर वेगवान हालचाली सुरू झाल्या.
कंपनीने बांधकाम परवाना केला सरेंडर
मिरा-भाईंदर महानगरपालिकेत १६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या महत्त्वपूर्ण सुनावणीपूर्वीच नाट्यमय घडामोडी घडल्या. 'सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन'ने महापालिकेच्या नगररचना सहायक संचालकांना पत्र लिहून या जागेचा बांधकाम प्रारंभ दाखला परत केला. जमिनीच्या मालकीवरून वाद सुरू असल्याने पालिकेने परवानगी रद्द करून भरलेले शुल्क परत करावे, अशी विनंती कंपनीने केली आहे.
पोलीस तक्रारही मागे
केवळ बांधकाम परवानाच नव्हे, तर २०१५ मध्ये वोहरा आणि त्यांचे सहकारी अजय धोका यांच्याविरुद्ध दाखल केलेली अतिक्रमण आणि धमकावल्याची पोलीस तक्रारही मागे घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या मध्यस्थीवर विश्वास होता आणि अखेर न्याय मिळण्याच्या दिशेने पाऊल पडले आहे, अशी प्रतिक्रिया वोहरा यांनी दिली.