श्रद्धा शेवाळे, ठाणे
बाप्पांच्या आगमनाची चाहूल लागताच सजावटीच्या बाजारात चैतन्य आले आहे. मात्र या चैतन्यावर प्लास्टिकच्या कृत्रिम फुलांनी नैसर्गिक सौंदर्याला आणि नैसर्गिक सुगंधाला ग्रहण लावले आहे. राज्य सरकारने प्लास्टिक फुलांवर बंदीची घोषणा करूनही बाजारपेठा आजही याच कृत्रिम फुलांनी ओसंडून वाहत आहेत. एकीकडे आकर्षक प्लास्टिक फुलांचा व्यवसाय तेजीत असताना दुसरीकडे वर्षभर घाम गाळून खरी फुले पिकवणार्या शेतकर्यांची स्वप्ने मात्र कोमेजून चालली आहेत.
प्लास्टिक फुलांमुळे स्थानिक फूलशेती, मधमाशी पालन आणि पर्यावरणावर होणारे गंभीर परिणाम लक्षात घेता यावर बंदी घालण्याची मागणी विधानसभेत कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी गेल्या पावसाळी अधिवेशनात केली. फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनीही कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याची घोषणा केली. प्लास्टिक फुलांच्या वाढत्या वापरामुळे खर्या फुलांची मागणी घटली असून राज्याचा हजारो कोटींचा फूलशेती व्यवसाय धोक्यात आला आहे, असे गोगावले यांनी मान्य केले. मात्र या बंदीच्या घोषणेने बाजारातील चित्र बदललेले नाही. गणेशोत्सवाच्या तोंडावर विक्रेते मोठ्या प्रमाणात प्लास्टिक फुलांची विक्री करत आहेत, तर ग्राहकही त्याकडेच आकर्षित होत आहेत.
नाशिक, पुणे, सातारा आणि सांगलीसारख्या जिल्ह्यांतील हजारो शेतकरी हरितगृहांमध्ये वर्षभर मेहनत घेऊन फुले पिकवतात. मात्र, बाजारात खर्या फुलांना मागणीच उरली नसल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे. अनेक शेतकर्यांनी कर्ज काढून सुरू केलेली फूलशेती आता तोट्यात गेल्याने त्यांनी इतर पिकांकडे वळण्यास सुरुवात केली आहे. आम्ही वर्षभर राबून फुले पिकवतो. पण लोकांच्या नजरेत आता प्लास्टिकच्या फुलांचीच किंमत वाढली आहे. खर्या फुलांचा सुगंध कुणी अनुभवायलाच तयार नाही. आमच्या घामाचे मोल कोण देणार, असा उद्विग्न सवाल राज्यातील फूलशेती करणारे शेतकरी करत आहेत.
गणपतीत काय कराल?
स्थानिक, ताजी फुले : सजावटीसाठी स्थानिक शेतकर्यांकडून ताजी फुले घ्या.
नैसर्गिक वाळलेली फुले : वाळलेली फुले आणि पाने सजावटीसाठी एक सुंदर पर्याय आहेत.
कागदी आणि कापडी फुले : हाताने बनवलेली कागदी किंवा कापडी फुले वापरा.
धान्य, पानांची आरास : आंब्याची पाने, नारळाच्या झावळ्या व विविध धान्यांचा वापर करून आकर्षक आरास करता येते.