shepherds
समाज बांधवांनी सुरत-नागपूर महामार्गावरील महिर फाट्यावर मेंढ्या सोडून रास्तारोको आंदोलन केले. (छाया : अंबादास बेनुस्कर)
ठाणे

पिंपळनेर : महामार्गावर मेंढ्या सोडत मेंढपाळांचा रास्तारोको

पुढारी वृत्तसेवा

पिंपळनेर,जि.धुळे : साक्री तालुक्यातील महिर, टेंभे प्र.भडगाव, वर्धान, नागपूर, लखमापूर, घाणेगाव पैकी रामनगर या गावांमधील पारंपारिक गुरचरण, गायरान वनजमिनीवर होणारे अतिक्रमण थांबविण्यासह गावांमधील ठेलारी, मेंढपाळ, धनगर लोकांविरुद्ध दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत अशा आदी मागण्यांसाठी गुरुवार (दि. ४) रोजी जिल्हा धनगर समाज संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्हाध्यक्ष रमेश सरक यांच्या नेतृत्वाखाली महिला व मुलांसह शेकडो समाज बांधवांनी सुरत-नागपूर महामार्गावरील महिर फाट्यावर मेंढ्या सोडून रास्तारोको आंदोलन केले आहे.

आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प होवून दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. आंदोलनाची माहिती मिळताच साक्री पोलिसांसह तहसीलदार साहेबराव सोनवणे व वनविभागाच्या अधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी रमेश सरक यांच्यासह आंदोलकांशी चर्चा करून बुधवार (दि.१०) रोजी बैठक घेवून मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. अर्धा ते पाऊण तास झालेल्या आंदोलनामुळे वाहनधारक, प्रवाशांसह शाळकरी विद्यार्थ्यांना देखील ताटकळत थांबावे लागले.

आंदोलनात धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष रमेश सरक, रावण शिवाजी सरग, भटू काळु सरक, सखाराम तापीराम टेंभे, गोरख नारायण मारनर, दगडू उदा गोरे, चिमा मरू लकडे, गुलाबा गेंदा गोरे, आबा मकन कोळपे, गोरख रघु सुसालदे, काळु राजु गोयेकर, विलास वाघमोडे, संजु गोयेकर, सोनू आप्पा टकले, नामदेव टकले, गोरख बळीराम गोयेकर, काळू उत्तम सरग, नथ्थू भाऊ कोरडकर, दयाराम बापू गरदरे, संजय मारनर, धोंडू भटू मारनर, संदीप पितांबर सरग, रामदास भिला सरग आदींसह ठेलारी, मेंढपाळ, धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

विविध मागण्यांसाठी धनगर समाज संघर्ष समितीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देवून रास्तारोको आंदोलनाचा इशारा दिला. मात्र मागण्यांबाबत प्रशासनाने कुठलीही दखल न घेतल्याने रमेश सरक यांच्या नेतृत्वाखाली ठेलारी मेंढपाळ धनगर समाज बांधवांनी एकत्र येत महिर फाट्यावर महामार्गावर एकाबाजुला ॲॅपेरिक्षा, पाणीटँकर उभे करीत तर दुसऱ्या बाजुला मेंढ्या चरण्यासाठी सोडून रास्तारोको आंदोलन केले. मेंढपाळांकडून यावेळी तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत.

मागण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत रास्तारोको आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला. त्यानंतर आंदोलनस्थळी साक्री पोलिस दाखल झाले. तसेच साक्रीचे तहसीलदार साहेबराव सोनवणे व वनअधिकारी खैरनार यांनी आंदोलकांची भेट घेतली. तसेच बुधवार (दि.१०) रोजी मेंढपाळांची बैठक घेवून मागण्यांबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिल्याने रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले आहे. त्यानंतर पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली आहे.

शासनाकडून वनजमिनीची पट्टे कुठलीही शहानिशा न करता वाटप केले जात आहेत. एकाला दोन ते तीन हेक्टर जमिन पैसे देवून परस्पर व्यवहार केले जात आहे. ती जमिन मेंढपाळांची आहे की नाही हे समिती पाहतही नाही. वास्तविक शासन निर्णयानुसार एका गावात एक ते दोन लोकांनाच वनपट्टे दिले गेले पाहीजेत.
रमेश सरक, धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष.
SCROLL FOR NEXT