Pimpaleshwar Mahadev Temple Land 
ठाणे

Pimpaleshwar Mahadev Temple Land: पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या जमिनीचा प्रश्न सुटला

संघर्ष संपला आणि महादेव भक्तांचा विजय झाला -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: महसूल आणि उद्योग विभागाच्या सकारात्मक सहकार्यामुळे पिंपळेश्वर महादेव मंदिराचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की, पिंपळेश्वर महादेवाच्या मंदिरासाठी सुरू असलेल्या एका प्रदीर्घ संघर्षाला पूर्णविराम मिळाला असून यात सर्व महादेव भक्तांचा विजय झाला आहे," असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. ही सर्व जमीन आता पिंपळेश्वर महादेवाला समर्पित करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार किसन कथोरे, आमदार कुमार आयलानी, आमदार सुलभा गायकवाड, आमदार राजेश मोरे, माजी खासदार कपिल पाटील, माजी कॅबिनेट मंत्री जगन्नाथ पाटील, जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल, पिंपळेश्वर मंदिराचे विश्वस्त (ट्रस्टी) आणि पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंदिरामध्ये विधीवत महापूजा करण्यात आली. याप्रसंगी भक्त मंडळाच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले.

आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व मंत्रिमंडळातील आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आणि सहकार्यामुळे हे पवित्र कार्य पूर्ण झाले आहे. मात्र, आम्ही सर्व जण केवळ निमित्तमात्र आहोत. जे कार्य करायचे असते ते महादेवच करवून घेतात.

त्यामुळे या यश प्राप्तीचे संपूर्ण श्रेय भगवान महादेवालाच जाते. हे पुण्यकर्म करण्याची संधी महादेवाने आम्हास दिली आणि आमच्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून हे कार्य पूर्ण करून घेतले, याबद्दल मी मंत्रिमंडळाच्या वतीने महादेवाचे आभार मानतो. या मंदिराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला असून, तोच सुवर्ण इतिहास पिंपळेश्वर महादेवाला पुन्हा प्राप्त करून देण्याचे काम शासन या ठिकाणी करणार आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंढरीनाथ पाटील यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.याप्रसंगी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे आणि आमदार रवींद्र चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार रवींद्र चव्हाण यांनी मांडलेल्या मंदिर परिसराच्या विकासाच्या सर्व मागण्या प्राधान्याने पूर्ण केल्या जातील, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT