नीती मेहेंदळे
विंचूरकर घराण्याचा इतिहास या बखरवजा पुस्तकात विंचूरची माहिती सापडते. त्याचं असं झालं, सरदार विंचूरकर म्हणजे मुळचे सासवडचे ‘दाणी’. शिवदेव दाणी नावाचे गृहस्थ सासवड इथे राहत होते. धान्याचा हिशोब ठेवण्याचे काम त्यांच्याकडे होते. त्यांना 3 मुलं. धाकटा विठ्ठल शिवदेव याला घोडेस्वारीत अधिक रस. त्यामुळे अंगापिंडाने मजबूत झालेला होता. पण रिकामा तरुण मुलगा काय कामाचा? घरातल्या लोकांची तो यावरून रोज बोलणी खाई. एके दिवशी बोलणे मनाला लागून घर सोडले आणि तो सातार्याच्या मर्ढे गावी तो राम उपासक अमृत स्वामी यांच्या मठात दाखल झाला. स्वामींची सेवा करून त्याने त्यांची मर्जी संपादन केली. पुढे शाहू महाराजांच्या पदरी सेवेत असलेल्या बक्षी नामक एका मानकर्याचं मठात येणं जाणं होतं. स्वामींनी विठ्ठलविषयी त्यांच्याकडे शब्द टाकला.
शाहू महाराजांच्या फौजेत दाखल झाल्यावर आपल्या हिकमतीवर विठ्ठलने नाव, वतन मिळवलं. हा बहाद्दर विठ्ठल पेशवाईत विठ्ठल शिवदेव विंचूरकर एक महत्त्वाचे सरदार म्हणून मान्यता पावला. पहिल्या बाजीरावाबरोबर सरदार विंचूरकर अनेक यशस्वी मोहिमांमध्ये होते. त्यानंतरही सदाशिवराव भाऊ, राघोबा पेशवे, माधवराव पेशवे यांबरोबर भक्कम कामगिरी करत पेशवाईत ते चांगलेच रुळले. चिमाजीअप्पा पेशव्यांसोबत वसईच्या लढ्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. तसेच पानिपतच्या प्रसिद्ध संग्रामातही त्यांचं योगदान आहे.
1744 मध्ये, जेव्हा नादाजी दरेकर यांनी विंचूरमध्ये अशांतता निर्माण केली, तेव्हा पेशव्यांनी विठ्ठल शिवदेव यांना बंड दडपण्यासाठी पाठवले. त्यांनी विंचूरवर हल्ला केला आणि नियंत्रण प्रस्थापित केले. या सेवेसाठी, पेशव्यांनी त्यांना विंचूर गावासह आसपासची काही गावं अनुदान दिली असल्याचे समजते. याच सुमारास त्यांनी विंचूर येथे वाडा बांधला जो आजही उभा आहे. हा वाडा त्यांचे मुख्य तळ बनले आणि त्यानंतर ते विंचूरकर म्हणून प्रसिद्ध झाले. म्हणून श्री विठ्ठल शिवदेव दाणी हा या घराण्याचा मूळ संस्थापक. त्यांची समाधी या विंचूर गावाबाहेर आहे. नीरा नृसिंहपूरच्या मंदिराचा जीर्णोद्धार या विठ्ठल शिवदेव विंचूरकरांनीच केला आहे अशी नोंद सापडते.
विंचूर गावातला विंचूरकरांचा तटबंदी असलेला वाडा (वाडा) गावातलं महत्त्वाचं स्थळ. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात असलेले विंचूर गाव नाशिक-औरंगाबाद महामार्गावर नाशिकपासून सुमारे 50 किमी अंतरावर आहे. पूर्वी हे पूर्ण गावाचं तटबंदीयुक्त होतं. वाड्याच्या पूर्वेकडील दरवाज्याला ‘होळकर वेस’ म्हणतात, होळकरांशी असलेल्या घनिष्ठ संबंधांचं प्रतीक आहे. होळकर विंचूर-चांदवड मार्गाने वारंवार प्रवास करत असत म्हणून आजही या प्रवेशद्वाराला होळकर वेस म्हणून ओळखले जाते. एकेकाळी सुस्थितीत असलेला वाडा आता दुर्लक्षामुळे त्याची दुर्दशा झाली आहे.
आयताकृती आकार असलेल्या या वाड्याची व्याप्ती साधारण 1.5 एकर एवढी असावी. मुख्य प्रवेशद्वार पश्चिमेकडे आहे आणि आत आणखी एक उत्तराभिमुखी दरवाजा आहे. पहिल्या दरवाजाचे लाकडी दरवाजे उद्ध्वस्त झाले आहेत, पण त्याची कमानी लाकडी चौकट शाबूत आहे. दुसरा दरवाजा अजूनही मजबूत असून एक दिंडी दरवाजा काय तो उरला आहे. या दरवाजाच्या आत पहारेकर्यांच्या देवड्या आहेत. दोन्ही दरवाजांच्या वर एकेकाळी नगारखाना असावा, आज त्याचे अवशेष दिसतात आणि दर्शनी भागाचं कोरीव काम शिल्लक आहे. या सजावटीच्या खाली 2 पडझड झालेली दगडी शिल्पे आहेत.
वाड्याच्या अंगणात सध्या झुडुपांनी जागा घेतली असून त्यात लपलेली काही शिल्पं दिसतात. मुख्य प्रवेशद्वाराच्या आत एक प्रशस्त चौकोनी अंगण आहे आणि त्याच्या चौफेर जोतं बांधलेलं आहे. चारही बाजूंना अनेक दालनं आहेत. वाड्यापासून थोड्या अंतरावर विंचुरकर कुटुंबाचे खासगी मालकीचे कृष्ण मंदिर आहे. सुमारे 200 वर्षांपूर्वी विंचुरकरांनी स्थापन केलेलं आणखी एक उल्लेखनीय बांधकाम म्हणजे पाणीपुरवठा व्यवस्था. विंचूरपासून सुमारे 3 किमी अंतरावर असलेल्या वस्तीत असलेल्या प्राचीन विहिरीतून पाणी काढले जात होते आणि बोगद्यातून गावात भूगर्भात आणले जात होते. विंचूर गावाबाहेर ही एक जुनी पेशवेकालीन पायर्यांची सुंदर विहीर आहे. तिला आत दरवाजा आहे आणि तिचं बांधकाम अजूनही भक्कम आहे.
या विहिरीतून 2 कारंजे आणि 7 टाक्या (हौद) यांना पाणीपुरवठा होत असे. यापैकी 2 टाक्या बालाजी मंदिराच्या मागे, फक्त 20 फूट अंतरावर आहेत, ज्यापैकी एकावर बोगद्याच्या वर त्याचं बांधकाम शके 1803 (इ.स. 1881) मध्ये झाल्याचं लिहिलेलं आहे. दुसरं टाकं शनी चौकात आहे, तर चौथं टाकं भरलं गेलं आहे. वाड्यासमोरील पाचवं टाकं घराला पाणी पुरवत असावं. कृष्ण मंदिराशेजारी असलेल्या सहाव्या आणि सातव्या टाक्यांमध्ये सर्वात मोठं सातवं टाकं होते. वाड्याला पुरातत्वीय दृष्टिकोनातून संवर्धनाची नितान्त गरज आहे.
विंचूर गावाच्या चारी दिशांना महत्त्वाची स्थळं आढळतात. निफाड तालुक्यातला कडवा आणि गोदावरी नद्यांचा संगम असलेलं प्रसिद्ध नांदूर मध्यमेश्वर देवालय समूह आणि अभयारण्य नैऋत्य दिशेला आहे. गावाच्या उत्तर दिशेस लागूनच लासलगाव आणि त्याची पेशवेकालीन गढी आहे. त्याही वर उत्तरेत होळकरांचं चांदवड आहे. विंचूरच्या वायव्येला धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं धोंडबे किंवा धोडांबे गाव विंचूरशी संबंधित आहे. आपल्या जहागिरीतलं हे गाव विठ्ठल शिवदेव यांनी त्यांच्या वडील भावाला दिलं असा इतिहास आहे. या गावात चालुक्यकालीन वटेश्वराचं मंदिर आहे.
विंचूरकरांकडे नाशिक तसेच मराठा साम्राज्यातील इतरत्र पंचेचाळीस गावे होती, त्यापैकी पैठणीसाठी प्रसिद्ध पावलेलं येवला हे विंचूर गावाच्या पूर्वेला आहे. दक्षिणेत धरणगाव गावात एक पुरातन विष्णू मंदिर आहे. मंदिराची निर्मिती चालुक्य काळातली असावी असा अंदाज आहे. मंदिर आज विपन्नावस्थेत आहे. त्याची अर्धमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गाभारा अशी रचना असून त्याचा सभामंडप अष्टकोनी आहे. बरीच पडझड झाली असल्यामुळे मोजक्या प्रतिमा शिल्लक आहेत व ओळखू येतात.
मंडपाच्या खांबांवर एकेक शक्तिदेवता कोरली आहे. तिथल्या देवकोष्ठावर शेषशायी विष्णूची प्रतिमा आहे. त्याच्या पायाशी लक्ष्मी स्पष्ट दिसते. काही खांबांवर कीर्तिमुखं कोरलेली दिसतात. गणपती, हरिहर, नरसिंह प्रतिमा मंदिराच्या भिंतींवर आढळतात. आज कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध ठरलेला पण ऐतिहासिक तसंच प्राचीन कालखंड पाहिलेला, अनुभवलेला हा विंचूरचा प्रदेश मोठा दस्ताऐवज उराशी बाळगून आहे आणि त्यातल्या स्थापत्याच्या संवर्धनासाठी पुरातत्वीय मदतीच्या प्रतीक्षेत आहे.