पातलीपाडा सेंद्रिय शेती प्रकल्प ठाणेकरांसाठी खुला pudhari photo
ठाणे

Patalipada organic farming project : पातलीपाडा सेंद्रिय शेती प्रकल्प ठाणेकरांसाठी खुला

विद्यार्थी-नागरिकांना नैसर्गिक शेती-भाजीपाला व्यवस्थापनाबाबत माहिती मिळणार

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेला ठाणे महानगरपालिकेचा पातलीपाडा येथील सेंद्रिय शेती प्रकल्प कृषी दिनाच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. महापालिकेच्या उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरणातर्फे या प्रकल्पाचे काम एप्रिल-2025मध्ये सुरू करण्यात आले होते.

ठाणे महापालिकेतर्फे फेब्रुवारी महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या वृक्षवल्ली प्रदर्शनाचे उद्घाटन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेने नागरिकांना आदर्श म्हणून सेंद्रिय शेती प्रकल्प करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागाने पातलीपाडा येथे सुमारे दीड एकर क्षेत्रात हा प्रकल्प विकसित केला आहे.

या प्रकल्पाचे काम एप्रिल-2025 मध्ये सुरू झाले. महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून त्याचे अनौपचारिक लोकार्पण करण्यात आले. आता हा प्रकल्प सर्व नागरिकांसाठी खुला असल्याची माहिती उद्यान अधीक्षक केदार पाटील यांनी दिली. या प्रकल्पाचे पूर्ण व्यवस्थापन उद्यान विभागामार्फत करण्यात येत आहे. सेंद्रिय शेती प्रकल्पामुळे विद्यार्थी व नागरिकांना नैसर्गिक शेती, पिके, भाजीपाला, फळझाडे, सेंद्रिय खताचा वापर आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन यासंबंधी माहिती व प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. तसेच, शेतीचे महत्त्वही समजून घेता येईल, असेही पाटील यांनी सांगितले.

सेंद्रिय उत्पादने अनाथाश्रम, वृद्धाश्रमांना देणार

ठाणे महापालिकेच्या हा उपक्रम समजोपयोगी व्हावा यासाठी या शेतामध्ये तयार होणारी सेंद्रिय उत्पादने अनाथाश्रम व वृद्धाश्रम यांना देण्यात येणार आहे. पातलीपाडा सेंद्रिय शेती प्रकल्प हा सर्वार्थाने, पर्यावरणपूरक, शैक्षणिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा उपक्रम ठरणार असल्याचा विश्वास ठाणे महापालिकेच्या उद्यान विभाग व वृक्ष प्राधिकरणास आहे. पातलीपाडा येथील महापालिकेच्या या सेंद्रिय शेती प्रकल्पास सोमवार ते शनिवार स. 10 ते सायं. 5. या वेळेत नागरिकांना भेट देता येईल. शाळांना विद्यार्थी भेटींचेही आयोजन करता येणार आहे.

प्रकल्पात काय?

या प्रकल्पात, विविध प्रकारचा भाजीपाला व पालेभाज्यांची लागवड करण्यात आली आहे. त्यात वांगी, भेंडी, टोमॅटो, मका, मिरची, ढोबळी मिरची, हिरवा व लाल कोबी, भुईमूग, रताळे, सुरण, लाल माठ, मेथी, कारले, दोडका, शिराळी, भोपळा अशा वेलवर्गीय भाज्या यांचा समावेश आहे. तसेच, दोन प्रकारचे तांदूळ व नाचणीचे उत्पादनही घेतले जात आहे. तर, फळझाडांमध्ये आंबा, लिंबू, चायनीज लिंबू, अ‍ॅवेकॅडो, अंजीर, केळी, सिताफळ, लक्ष्मणफळ, डाळिंब, बुटका नारळ आदी झाडांची लागवड करण्यात आली आहे. प्रकल्प क्षेत्रात कृत्रिम तलाव तयार करून त्यामध्ये वॉटर लिली व मासे सोडण्यात आले आहेत. भविष्यात या प्रकल्पामध्ये कोंबड्या, गाई, शेळ्या, टर्की व बदक पालन यांचा समावेश करण्याची योजना आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT