पालघर (ठाणे) : पाण्याच्या प्रवाहामुळे सायलेंट रिसॉर्ट लगत वैतरणा नदीचा काठ खचल्यामुळे मनोर ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी उघडी पडल्याने जलवाहिनी तुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. जलवाहिनीचा आधार खचल्याने दोन पाइप मधला सांधा निखळून मनोरचा पाणीपुरवठा बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
योजनेच्या अपूर्ण कामांमुळे मनोर ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून ताब्यात घेतलेली नाही. जलवाहिनीच्या आधार देण्यासाठी भराव कामाबाबत वाद असल्याने काम रखडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.जल वाहिनी तुटून पाणीपुरवठा बंद झाल्यास ऐन पावसाळ्यात मनोरकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे
मनोर गावच्या पाणीपुरवठा योजनेला वैतरणा नदीवरील रिसॉर्ट लगतच्या बंधार्यातून पाणीपुरवठा केला जातो.वैतरणा नदी पात्रात बांधलेल्या जॅकवेल मधून नदीच्या काठावरून बारा इंच व्यासाची जलवाहिनी टाकून वैतरणा नदीचे पाणी मनोरच्या मुख्य साठवण टाकीत आणले जाते. आठवडाभरा पासून पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे वैतरणा नदीला पूर आला होता.सोमवारी सायंकाळी पुराच्या पाण्याच्या प्रवाहामुळे बंधार्याच्या खालच्या बाजूकडील नदीचा काठ खचून काठाची माती नदी पात्रात वाहून गेल्याने मनोरच्या पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी उघडी पडली आहे.माती अभावी जलवाहिनीला आधार निघून गेल्याने दोन पाइप मधील सांधा निखळून जलवाहिनी नादुरुस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बंधार्याच्या खालच्या बाजूकडील नदीचा काठच्या 15 ते 20 फूट खोल आणि 30 ते 40 फूट रुंद भागातील माती वाहून गेल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने दिली आहे. जोरदार पाऊस,पुर आणि नदी काठच्या भूस्खलनामुळे नादुरुस्त जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.मनोर गावाचा पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने पावसाळ्यात ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
मंगळवारी (दि.24) सकाळी ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांनी खचलेल्या पाहणी केल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी नितीन पवार यांनी दिली. कंत्राटदाराने पाणीपुरवठा योजनेची कामे अपूर्ण ठेवल्याने मनोर ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा योजना ताब्यात घेतलेली नाही. ग्रामपंचायती कडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात पत्रव्यवहार केल्यानंतरही योजनेची कामे पूर्ण करण्यात आली नाही.
चार कोटी 35 लाख रुपये खर्च करून मनोरच्या पाणीपुरवठा योजनेच्या बंधार्यांची उंची वाढवण्यात आली आहे.चार लाख 20 हजार लिटर पाणी साठवण क्षमता असलेली टाकी, दीड लाख लिटर आणि साठ हजार लिटर क्षमतेच्या दोन साठवण टाक्या, जकवेल पासून मुख्य साठवण टाकी पर्यंत 12 इंचाची नवीन जलवाहिनी आणि साठवण टाकीतून गावातील वितरणासाठी नवीन जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत.