Palghar Sea Airport Project 
ठाणे

Palghar Sea Airport Project - मुंबई महानगराला मिळणार तिसरा 'आकाशमार्ग'

पालघरच्या समुद्रात ९ कोटी प्रवासी क्षमतेचे विमानतळ प्रस्तावित ; डीपीआरची प्रक्रिया सुरू

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : श्रद्धा कांदळकर

मुंबई आणि नवी मुंबईनंतर आता मुंबई महानगर प्रदेशाच्या हवाई वाहतुकीला पालघरच्या समुद्रातून नवा 'टेक ऑफ' देण्याची तयारी सुरू झाली आहे. पालघर जिल्ह्यातील कोरे बीचजवळ समुद्रात भराव टाकून प्रस्तावित असलेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सविस्तर तांत्रिक-आर्थिक व्यवहार्यता अभ्यास आणि सविस्तर प्रकल्प अहवालाची (डीपीआर) प्रक्रिया सुरू झाली आहे. पूर्ण क्षमतेने विकसित झाल्यानंतर तब्बल ९ कोटी प्रवाशांची वार्षिक हाताळणी करण्याची क्षमता या महत्त्वाकांक्षी विमानतळाची प्रस्तावित आहे.

विशेष म्हणजे हा केवळ विमानतळ राहणार नसून विमानतळ, वाढवण बंदर, महामार्ग, रेल्वे मालवाहतूक कॉरिडॉर यांना जोडणारे मोठे मल्टीमॉडल ट्रान्सपोर्ट हब म्हणून त्याची उभारणी करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पालघरच्या किनारपट्टीवर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या वाहतूक आणि लॉजिस्टिक केंद्रांपैकी एक उभे राहण्याची शक्यता आहे. प्रस्तावित विमानतळ कोरे बीच परिसरातील समुद्रात भराव टाकून तयार करण्यात येणाऱ्या भूभागावर उभारण्याची संकल्पना आहे. पूर्व-व्यवहार्यता अभ्यासात ही जागा प्रकल्पासाठी योग्य असल्याचे समोर आले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जूनमध्ये या प्रकल्पासाठी डीपीआर तयार करण्याचे निर्देश दिले होते. विमानतळासाठी दोन धावपट्ट्यांची संकल्पना असून, २०५० पर्यंत मुंबई परिसरातील विमानतळांवर वाढणारा हवाई वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

प्रस्तावित विमानतळ आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक मानकांनुसार विकसित करण्याचे नियोजन आहे. दोन समांतर धावपट्ट्या, समांतर टॅक्सीवे, अत्याधुनिक प्रवासी टर्मिनल, कार्गो व लॉजिस्टिक हब, विमान देखभाल-दुरुस्ती सुविधा आणि व्यावसायिक विकास क्षेत्र उभारण्याची योजना आहे. वाढवण बंदराच्या विकासासोबतच हा विमानतळ उभारला गेल्यास पालघरच्या किनारपट्टीवर बंदर-विमानतळ-महामार्ग-रेल्वे यांचे एकात्मिक वाहतूक जाळे निर्माण होऊ शकते. वाढवण बंदराशी संबंधित मालवाहतूक, लॉजिस्टिक्स, गोदामे, निर्यात-आयात व्यवसाय आणि औद्योगिक गुंतवणुकीला यामुळे मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.

सी-लिंकशी महत्त्वाकांक्षी जोड

पालघर जिल्ह्यातील उत्तन-विरार सी-लिंक प्रोजेक्टचा प्रस्तावित विस्तार आधीच मुंबई-वाढवण कनेक्टिव्हिटीसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. २०२६ मध्ये या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील जमीन संपादनाची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे विमानतळ आणि सी-लिंकचे नियोजन एकमेकांशी जोडले गेल्यास मुंबई शहराच्या पश्चिम उपनगरांपासून पालघरपर्यंत वाहतुकीचे नवे चित्र निर्माण होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT