नेवाळी (ठाणे): पलावा उड्डाणपुलाच्या लोकार्पणानंतर सोमवारी (दि.7) रोजी शिंदेची शिवसेना आणि मनसे आमने सामने आल्याचे चित्र दिसून आले आहे. मनसेचे नेते राजू पाटील हे सोमवारी (दि.7) उड्डाणपुलाची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी पाटील यांनी उड्डाणपुलाचे निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे सांगत स्टक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली असल्याचे सांगितले.
उड्डाणपुलावर निर्माण झालेल्या खड्डेमय परिस्थितीचे वास्तव पाटील यांनी समोर आणले आहे. यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख विवेक खामकर आणि शिवसेनेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. मात्र लोकार्पण झाल्यापासून पलावा उड्डाणपुलाला राजकीय हादरे बसल्याचे दिसून आले आहे.
कल्याण शीळ रस्त्यावरील पलावा उड्डाणपुलाचे शुक्रवारी लोकार्पण झाले होते. गुपचूप घाईघाईत लोकार्पण झाल्यानंतर उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यानंतर मनसेसह ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील शिंदेच्या शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडण्यात आली नाही.
शिंदेंच्या शिवसेनेकडून उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरक्षित असल्याचा दावा वेळोवेळी व्हीडिओ तयार करून दाखविला जात होता. उड्डाणपुलावर दुचाकीस्वारांचे सुरू असलेले अपघातांचे सत्र व त्यामागील कारण मनसेचे नेते राजू पाटील यांनी एक्स पोस्टद्वारे समोर आणले होते. त्यातच शिवसेना ठाकरे पक्षाच्यावतीने देखील सातत्याने सत्ताधार्यांना लक्ष्य करण्यात आल्याने आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सोशल मीडियावर सुरू झाल्या होत्या.
दरम्यान उड्डाणपुलाच्या लोकार्पणानंतर दुरवस्था झालेल्या या उड्डाणपुलावरून सोशल मीडियावर टीकेची झोड नेटकर्यांकडून घेण्यात आली होती. या उड्डाणपुलावरील वास्तव हे डोंबिवलीकरांसमोर आणण्यात आले होते. त्यामुळे शुक्रवारपासून उड्डाणपुलावरील खडी बाजूला करण्याचे काम अंतिम टप्प्यात आल्याचे चित्र सोमवारी (दि.7) दिसून आले आहे.
मनसेचे नेते राजू पाटील यांनी या उड्डाणपुलाची पाहणी केल्यानंतर सांगितले की, चार तारखेला आमच्या पलावा पुलाचे लोकार्पण येथील स्थानिक आमदारांनी केले. घाईघाईत केले, पण का केले ते माहीत नाही. कारण या पुलाचे थोडे काम बाकी होते. जून महिन्यात आम्ही या पुलाची पाहणी केली तेव्हाच निदर्शनास आले होते की, या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. सर्व तपासण्या, व्हिजेटीआयमार्फत ऑडिट करून हा पूल वाहतुकीसाठी सुरू करावा असे पत्र देखील दिले आहे. असे असताना ठेकेदाराने यांना हॅन्ड ओव्हर दिलेले नाही, असे असताना यांनी त्याच घाईघाईत लोकार्पण केला. त्यानंतर काही दुचाकीस्वार पडल्यानंतर पूल बंद देखील केला पण त्याच्यावर ग्रीट पावडर टाकून सुरू देखील केला; परंतु आता पाहिले तरी या उड्डाणपुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे.