डोंबिवली : काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला असून, डोंबिवलीसाठी तर हा एक काळा दिवस ठरला आहे. या भ्याड हल्ल्यात डोंबिवलीतील तीन तरुणांचा मृत्यू झाला असून, त्यांच्यासोबत गेलेल्या कुटुंबीयांनी मृत्यूला डोळ्यांसमोर पाहिलं.
या हल्ल्यात डोंबिवलीतील संजय लक्ष्मण लेले (वय ५२), हेमंत जोशी (वय ४३) आणि अतुल मोने (वय ४४) यांचा मृत्यू झाला आहे. ते तिघेही आपल्या कुटुंबासह काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले होते. संजय लेले हे शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांचे मेहुणे होते. त्यांच्यासोबत गेलेले हेमंत आणि अतुल हे दोघे संजय लेले यांच्या पत्नी कविता यांचे मावस व आतेभाऊ होते. हल्ल्यात संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेले (वय २०) किरकोळ जखमी झाला असून त्याच्या बोटाला गोळी लागली आहे. मात्र, अत्यंत धीराने त्याने संपूर्ण संकटाचा सामना करत कुटुंबीयांना सावरण्याचे काम केले आहे. संजय लेले यांची पत्नी कविता, अतुल मोने यांची पत्नी अनुष्का आणि त्यांची १६ वर्षांची मुलगी रुचा, तसेच हेमंत जोशी यांची पत्नी मोनिका व त्यांचा १५ वर्षांचा मुलगा ध्रुव हे सर्वजण सुखरूप आहेत.
या भीषण घटनेनंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तात्काळ परिस्थितीची दखल घेतली असून, आपले स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर यांना श्रीनगरला पाठवले आहे. राजेश कदम आणि दोन्ही कुटुंबीय आज पहाटे श्रीनगरला रवाना झाले आहेत. या कुटुंबीयांच्या मदतीसाठी डॉ. शिंदे यांची एक टीम देखील कार्यरत आहे. आमदार रवींद्र चव्हाण, आमदार राजेश मोरे, ठाणे जिल्हाधिकारी श्री शिनगारे, कल्याण प्रांत अधिकारी गोसावी, डीसीपी अतुल झेंडे आणि तहसीलदार हे देखील सतत संपर्कात राहून मदतीसाठी प्रयत्न करत आहेत.