डोंबिवली : पश्चिम डोंबिवलीत घृणास्पद घटना घडली आहे. एका किराणा दुकानात चाॅकलेट खरेदीसाठी गेलेल्या बालिकेशी 38 वर्षीय किराणा मालाच्या दुकानदाराने माळ्यावर नेऊन अश्लिल चाळे करून तिचा विनयभंग केला. हा प्रकार कळताच परिसरातील रहिवाशांसह पादचाऱ्यांनी यथेच्छ बदडून या दुकानदाराला पोलिसांच्या हवाली केले.
पिडीत बालिकेच्या आईने विष्णूनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी या दुकानदारावर तात्काळ अटकेची कारवाई केली. उमाराम चौधरी असे दुकानदाराचे नाव असून त्याचे पश्चिम डोंबिवलीमध्ये किराणा सामान विक्रीचे दुकान आहे. याच दुकानावरच्या पोट माळ्यावर हा दुकानदाराचे वास्तव्य आहे.
दुपारच्या सुमारास एक बालिका उमाराम चौधरी याच्या दुकानात चाॅकलेट खरेदी करण्यासाठी गेली होती. त्यावेळी दुकानात अन्य कुणीही ग्राहक नव्हते. बालिकेला एकटी पाहताच दुकानदारातील हैवान जागा झाला. त्याने या बालिकेला चॉकलेट देण्याचे अमिष दाखवले. त्यानंतर गोड बोलून तिला दुकानावरच्या माळ्यावर नेले. तेथे तिच्याशी अश्लिल चाळे सुरू केले.
अचानक घडत असलेल्या प्रकारामुळे बालिका भयभीत झाली. दुकानदाराच्या तावडीतून कशीबशी सुटका करवून धूम ठोकली. बालिकेने दुकानाबाहेर येऊन आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूच्या रहिवाशांसह पादचाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आला. दुकानदाराला जाब विचारला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने या सर्वांनी मिळून बालिकेशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या दुकानदाराला यथेच्छ बदडून काढले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दुकानदाराची जमावाच्या तावडीतून सुटका केली. उमाराम चौधरी याच्या विरूद्ध बालकांचे लैंगीक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 6 अन्वये गुन्हा नोंदवून अटक केली. कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याला अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.