Shivsena vs UBT  
ठाणे

Shivsena vs UBT | ऑपरेशन टायगर अंतर्गत उपमुख्यंमत्री शिंदे यांची उबाठा खासदारांसोबत गुप्त बैठक? 

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मात्र फेटाळले कथित बैठकीचे वृत्त, उबाठाकडूनच फुटीच्या बातम्या पेरल्या जातात - म्हस्के  

पुढारी वृत्तसेवा

ठाणे :  शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'ऑपरेशन टायगर'ला गती दिली असून ठाकरे गटाच्या सात खासदारांना गळाला लावल्याची चर्चा रंगली आहे. नामदार शिंदे यांनी ठाकरेंच्या खासदारांसोबत ठाण्यातील एका कंपनीच्या आवारात नुकतीच पहाटेपर्यंत बैठक घेतल्याचे वृत्त बाहेर पडल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. मात्र अशी कोणतीही बैठक झाली नसल्याचा दावा करीत नामदार शिंदे यांनी उबाठाच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचे वृत्त पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले आहे.

दुसरीकडे  पक्षांतर्गत उफाळून आलेल्या नाराजीवरुन लक्ष हटवण्यासाठी संजय राऊतच उबाठाचे खासदार फुटणार, ऑपरेशन टायगर, अशा खोट्या बातम्या पसरवीत असल्याचा आरोप  खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आठ खासदार हे शिवसेना शिंदे गटात जाणार असून त्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर राबविले असल्याची चर्चा रंगली आहे.  मात्र ऑपरेशन टायगरला भाजप नेवृत्वाकडून रेड सिग्नल लागल्याने मिशन थंडावले होते.

मात्र शिंदे यांनी नुकतीच ठाण्यात रात्रभर ठाकरे गटाच्या पाच खासदार आणि दोन खासदार ऑनलाईन पद्धतीने बैठक घेतल्याचे वृत्त बाहेर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.  कारण काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या डिनर डिप्लोमसीला  ठाकरे गटाच्या दोन बड्या खासदारांनी हजेरी लावली होती.  त्यापार्श्वभूमीवर शिंदे यांनी ठाकरे गटाच्या सात खासदारांची गुप्त बैठक घेतल्याचे वृत्त बाहेर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

ऑपरेशन टायगरची चर्चा रंगली असताना ठाकरे गटाच्या खासदारांसोबत झालेल्या बैठकीचे वृत्त उपमुख्यमंत्री शिंदे यांनी फेटाळून लावले.  उबाठाच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचे वृत्त पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारे आहे. अशी कोणतीही बैठक झालेली नाही. उबाठाचे खासदार फुटून शिवसेनेत येणार असल्याच्या बातम्या गेल्या एक-दीड वर्षांपासून पसरवल्या जात आहेत. परंतु, त्यात कोणतेही तथ्य नाही,या असे त्यांनी म्हटले आहे.  त्याचवेळी  डॉ, श्रीकांत शिंदे यांनी अशा बैठकीचे वृत्त फेटाळून लावले. 

तर  खासदार नरेश म्हस्के यांनी  या अफवांमागे ठाकरे गटाच्या नेते असल्याचा आरोप केला आहे. एकामागून एक निवडणुकांमध्ये झालेले दारुण पराभव, नेतृत्वाचे अपयश आणि पक्षांतर्गत उफाळून आलेल्या नाराजीवरुन लक्ष हटवण्यासाठी उबाठाचे नेते खासदार फुटणार, ऑपरेशन टायगर, अशा खोट्या बातम्या माध्यमांमध्ये पसरवण्याची केविलवाणी धडपड करत आहेत, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. 

 खासदार म्हस्के म्हणाले की, शिवसेनेचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांसाठी स्नेह भोजन आयोजित केले होते. दिल्लीत महाराष्ट्रातील खासदार एकमेकांच्या संपर्कात असतात. ही एक संस्कृती आहे. वेगवेगळ्या पक्षांच्या खासदारांनी एकमेकांशी संवाद साधला, एकत्र भोजन केलं तर पक्ष फुटणार, असे समजणे चुकीचे आहे, असे खासदार म्हस्के म्हणाले. त्यामुळे माध्यमांमध्ये सुरु असलेल्या ऑपरेशन टायगरसंदर्भातील बातम्या निराधार आहेत. उबाठा खासदारांबाबत कोणत्याही विषयावर बैठक झालेली नाही, असे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे व संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही स्पष्ट केले आहे, असे खासदार म्हस्के म्हणाले.  यामागे संजय राऊत असून राऊतांच्या कटकारस्थानामुळेच उबाठा पक्ष मृतावस्थेत गेलाय.  उबाठा खासदार अरविंद सावंत यांचे पक्षांतर्गत हितशत्रूच अशा बातम्या पसरवत आहेत. पक्षांतर्गत कोणीतरी सावंत यांना बदनाम करत आहेत, म्हणून त्यांना वारंवार अग्निपरिक्षा द्यावी लागतेय, असा टोला खासदार म्हस्के यांनी सावंत यांना लगावला. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT