ठाणे : मोबाईलवर गेमिंग हा खेळ खेळताना मागील काही दिवसात तब्बल २ लाख रुपये हरल्याच्या नैराश्येतून ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील गावात राहणाऱ्या २४ वर्षीय तरुण शंकर शत्रुघ्न कातकडे याने रविवारी (दि.2) दुपारी नैराश्येतून गळफास घेऊन जीवन संपवल्याचे उघडकीस आले आहे. सदर मृतक तरुण हा पैसे कमविण्यासाठी आणि उदरनिर्वाहासाठी इलेक्ट्रीशियन व प्लंबरची काम करायचा अशी माहिती पोलिसांनी दिली.
मयत हा गेली काही दिवासांपासुन घोडबंदर रोड, कासारवडवली परिसरातील लोढा रिव्हरव्हयु या कामाच्या ठिकाणी एकटाच राहत होता. तसेच तो मोबाईल वरून बीगवीन या गेमींग ॲपवर ट्रेडींग करायचा. त्या गेममध्ये तो काही दिवसांपुर्वी दोन लाख रूपये हरलेला होता. तसेच त्याने तक्रारदार तथा मित्र अक्षय सिरसाट यांच्याकडूनही ५० हजार रूपये उसने घेतले होते. याच दरम्यान मयत याने गेमिंगमुळे आर्थिक विवंचनेमध्ये अडकल्याने आणि झालेला तोटा भरून काढण्याचे पर्याय नसल्याने तो चिंतेत असल्याचे मृतक शंकर याने त्याने त्याच्या मित्रांना सांगितले होते.
अखेर तरुण रविवारी २ नोव्हेंबर रोजी काम करत असलेल्या सोसायटीच्या गच्चीवरील छताच्या लोखंडी हुकाला वायरने गळफास घेत जीवन संपवले. हा प्रकार समोर आल्यावर तातडीने त्याला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केल्यावर तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी बोलताना दिली. याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.