ठाणे: सायबर चोरटे नागरिकांना लुबाडण्याच्या रोज नवनवीत क्लृप्त्या शोधून काढतात. घरबसल्या पैसे कमवा, तुमच्या लोनचे हप्ते स्थगित करा, पीएफ फंड दोन दिवसात मिळवा, रिफंड, बिनव्याजी कर्ज, नोकरी मिळवा, हनीट्रॅप अशा स्वरूपाच्या विविध लिंक बनवून ती मोठ्या प्रमाणावर वायरल केली जातेय.
ही लिंक ओपन करताच बँक खात्यातून ऑनलाइन पैसे लंपास होत असल्याच्या तक्रारी सायबर पोलिसांकडे येऊ लागल्या आहेत. त्यात आता एक रुपयाच्या नव्या लिंकने धुमाकूळ घातला आहे.
तुमच्या नावाने महागडे कुरियर आले असून ते मिळवण्यासाठी आम्ही पाठवलेल्या लिंकवर क्लिक करून एक रुपयांचे ऑनलाइन पेमेंट करा, त्यानंतर हे कुरियर तुमच्या पर्यंत पोहचेल असे सायबर चोरटे सांगतात.
त्यानंतर या लिंकवर एक रुपये पाठविल्यास काही वेळातच बँक खात्यातून हे चोरटे ऑनलाइन पैसे लंपास करतात. त्यामुळे अशा लिंक ओपन आणि डाउनलोड करू नयेत असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सध्या सायबर गुन्हेगारांनी आपला उपद्रव वाढवला असून हे भामटे फसवणुकीच्या नवनवीन कल्पना अमलात आणून अनेक सर्वसामान्यांची फसवणूक घडवून आणत आहेत. डिजिटल अरेस्ट, ऑनलाइन शेयर मार्केट गुंतवणूक, झटपट ऑनलाईन कर्ज, आयकर व इतर टॅक्सचा रिफंड, घर बसल्या पैसे मिळवा, डेबिट कार्ड व बँक खाते पडताळणीचे फेक कॉल, हनीट्रॅप व ब्लॅकमेलिंग अशा एक ना अनेक फसवणुकीच्या क्लुप्त्या या गुन्हेगारांनी शोधून काढल्या आहेत.
ऑनलाइन डल्ला मारून नागरिकांची फसवणूक
सायबर चोरट्यांनी फसवणुकीची ही नवी पद्धत शोधून काढली असून त्यासाठी खास एक लिंक तयार केली आहे. या लिंकवर जाऊन इतरांना ऑनलाइन पैसे ट्रान्सफर केल्यास आपल्या बँक खात्याची माहिती व पिन क्रमांक सायबर ज्या व्यक्तीस पैसे पाठवतो त्यास प्राप्त होते.
याच माहितीच्या आधारे सायबर चोरटे ऑनलाइन डल्ला मारून नागरिकांची फसवणूक करतात. सायबर तज्ज्ञ यांच्या मते यातून वाचण्याचा एकच पर्याय आहे, तो म्हणजे अनाेळख्या व्यक्तीने पाठवलेल्या लिंक ओपन करू नये. काेणत्याही प्रकारची फाईल आपल्या माेबाईलमध्ये इन्स्टाॅल करू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.