उल्हासनगर : क्रेडिट सोसायटीकडून घेतलेले कर्ज माफ करावे म्हणून चार कर्जदारांनी चेअरमनवर दबाव टाकून अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारी याच्यामार्फत ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचप्रमाणे कर्जदारांचे कर्ज माफ कर अन्यथा 1 करोडची खंडणी दे, अशी मागणी सुरेश पुजारीने केली होती. या प्रकरणातील फरार आरोपी पंकज तिलोकानी याला ठाणे गुन्हे शाखेने अटक करीत न्यायालयात हजर केले.
अमित वाधवा यांच्या कल्पतरू या पतसंस्थेतून रोशन महेश माखिजा, पंकज त्रिलोकानी, उमेश राजपाल, सुशील उदासी यांनी आपसात संगनमत करून दोन कोटीच्या आसपास कर्ज घेतले होते. त्यातील कर्जाची अर्धी रक्कम जमाही केली होती. मात्र उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ करत होते. त्यावेळी डॉन सुरेश पुजारी याने अमित वाधवा याला फोन करून एक कोटीची खंडणी देण्यासाठी धमकावले.
अमितने देण्यास नकार दिला. त्यावेळी सुरेश पुजारीने पुन्हा फोन करून रोशन माखीजा, पंकज त्रिलोकानी, उमेश राजपाल आणि सुशील उदासी हे माझे खास माणसं आहेत. त्यामुळे त्याचे उर्वरित रक्कम माफ करून त्यांना ना हरकत प्रमाणपत्र देऊन मोकळ कर आणि जी काही रक्कम उरेल ती मला दे असे अमित वाधवाला धमकावले होते.
या प्रकरणी 2021 मध्ये अमित वाधवा यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हा गुन्हा ठाणे गुन्हे शाखा यांना सोपविण्यात आला होता. या चौघांनी सेशन कोर्टातून जामीनसाठी अर्ज दिला असता त्यातील रोशन माखिजा, उमेश राजपाल, सुशील उदासी याला जामीन मिळाला होता.
सर्वोच्च न्यायालयाने पंकज तिलोकानी याला अंतरिम जामीन देण्यास नकार देत हजर होण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ठाणे गुन्हे शाखेने पंकज याला अटक करीत उल्हासनगर न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.