पन्हाळा : शेकडो वर्षांपासून मानवी वस्ती असलेला पन्हाळा हा एकमेव किल्ला आहे. मानवी वस्तीमुळेच याच किल्ल्यावरील स्मारके सुस्थितीत राहिली आहेत.
वर्षानुवर्षे किल्ल्यावर वास्तव्य करत, किल्याच्या जतन आणि संवर्धन करणार्या स्थानिकांवरच नव्याने आणखी निर्बंध लादले जाणार असतील, तर युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ यादीतून पन्हाळ्याला वगळा, अशी आक्रमक मागणी स्थानिक नागरिकांनी केली. याप्रश्नी रस्त्यावरची लढाई लढण्याचा निर्धार रविवारी (दि.9) झालेल्या सर्वपक्षीय गावसभेत करण्यात आला. यावेळी सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. कृती समिती स्थापन करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
जागतिक वारसास्थळ यादीत पन्हाळ्याचाही समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव आहे. पन्हाळा पर्यटन महोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार विनय कोरे यांनी मे महिन्यात याबाबतची अंतिम बैठक पॅरिस येथे होणार असून, याबाबतची प्रक्रिया जवळपास पूर्णत्वाकडे आल्याचे सांगितले होते, तेव्हापासून पन्हाळावासीयांत असंतोष आणि भीती आणखी वाढली आहे. युनेस्कोच्या पथकाने पाहणी केल्यानंतर गडावरील अनधिकृत व कायदेशीर बांधकामे हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
चार दरवाजाजवळील ऐतिहासिक प्रवासी कर नाका पाडण्यात आला. आकाशवाणीचा टॉवर काढला जाणार आहे. मोबाईल टॉवर्स हटवण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. गडावरील पाण्याची टाकीही पाडली जाणार आहे. यामुळे जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित झाला, तर स्थानिक रहिवाशांना गड खाली करावा लागेल, अशी भीती आहे.
याविरोधात सोमवार (दि.10) पन्हाळ्यात स्थानिक नागरिकांनी गावसभेचे आयोजन केले होते. वकील द्रुपद पाटील म्हणाले, संपूर्ण गड जागतिक वारसास्थळ झाल्यास येथे वस्ती कायम राहू शकणार नाही. पुण्यातील शनिवारवाडा परिसरातील वस्तीसाठी असेच निर्बंध लागू झाले आहेत. यामुळे याला विरोध केला नाही, तर भविष्यात गड खाली करावा लागेल.
अॅड. रवींद्र तोरसे म्हणाले, नागरी वस्तीमुळेच स्मारके राहिली, तरीही नागरिकांना अंधारात ठेवून त्यांच्याच हक्कावर गदा आणणार, निर्बंध लादणार असाल, तर मानांकनातून पन्हाळ्याला वगळा. माजी उपनराध्यक्ष चेतन भोसले म्हणाले, या ठिकाणी सर्व शासकीय कार्यालये आहेत.
70 वर्षांपूर्वी राज्य शासनाने नगरपालिका स्थापन केली आहे. या ठिकाणी असणारी स्मारके आमच्या पूर्वजांनी जपून ठेवली आहेत. आता आम्हाला विस्थापित करणार असाल, तर हे मानांकन करून सरकार काय साध्य करणार आहे? त्याला आमचा पूर्ण विरोध आहे. माजी नगराध्यक्ष आसिफ मोकाशी म्हणाले, आजच्या सभेत मानांकनात पन्हाळ्याचा समावेश करण्यास सर्वांनी विरोध केला आहे. या किल्ल्यावर मानवी वस्ती असल्यामुळे राज्य शासनाने दुसर्या किल्ल्याचा समावेश करावा.
यावेळी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत गवंडी, सुनील हावळ, जमीर गारदी, जीवन पाटील, सतीश भोसले, अख्तर मुल्ला, रामानंद गोसावी, सुनील काशीद, जितेंद्र पवार, रमेश स्वामी, विनोद गायकवाड, राजू सोरटे, मंदार नायकवडी, आयाज आगा, अमित दळवी, संभाजी गायकवाड, मुबारक मुजावर, धनंजय बच्चे, प्रकाश गवंडी, दिलीप दळवी, राजीव सोरटे, नियाज मुल्ला आदी उपस्थित होते.
जागतिक वारसास्थळ नामांकनाच्या विरोधात कृती समिती स्थापन करणे
गडावरील वस्तीबाबत ऐतिहासिक दस्तावेज गोळा करणे
राजस्थानमधील जैसलमेर, कर्नाटकातील हम्पी आणि बदामी येथे भेट देऊन अभ्यास करणे
स्थानिक आमदार-खासदार आणि प्रशासकीय अधिकार्यांशी चर्चा करून नामांकनाला विरोध करणे
नवीन बांधकामे, दुरुस्तीला बंदी येईल
सर्व अनधिकृत, काही कायदेशीर बांधकामे पाडली जातील.
हॉटेल, दुकाने, स्टॉल्स बंद करावे लागतील
शासकीय कार्यालयांचे स्थलांतर होईल
गड निर्जन बनण्याची शक्यता आहे