शहापूर : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर आज सकाळी अनपेक्षित घडामोड घडली. पगारवाढ व इतर मागण्यांकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे समृद्धी महामार्गावरील आयसी 24 खुटघर टोल प्लाझा व आयसी 25 निंबवली टोल प्लाझा सताड उघडे ठेऊन कर्मचाऱ्यांनी आज सकाळी 8 वाजता अचानक कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतल्याने संपूर्ण महामार्गावरील टोल वसुली ठप्प झाली होती. अखेर टोल प्रशासनाकडून ठोस आश्वासन देण्यात आल्यानंतर साडेचार तासानंतर पुन्हा टोल वसुली सुरु झाली.
मुंबईहून सुरू होणारा आणि नागपूरकडून येणाऱ्या मार्गाचा शेवटचा टोल असलेला निंबवली पथकर टोल नाका पूर्णपणे रिकामा होता. गेट्स खुले, बॅरिअर्स वर केलेले परंतु एकही कर्मचारी हजर नसल्याने वाहनचालकांना पूर्णपणे मोफत प्रवासाची संधी मिळाली. अनेक वाहनचालकांनी ही परिस्थिती अगदी अविश्वासाने अनुभवली. कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसह विविध सुविधा देण्याबाबत त्यांनी व्यवस्थापनाला वारंवार लेखी मागण्या सादर केल्या होत्या.मात्र, मागण्यांकडे सतत दुर्लक्ष होत असल्याने आजची तीव्र भूमिका घेण्यावाचून पर्याय नव्हता असे कर्मचाऱ्यांनी बोलताना सांगितले. या अनपेक्षित कामबंद आंदोलनामुळे टोल प्रशासनात एकच धांदल उडाली.
परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने कर्मचाऱ्यांशी चर्चा सुरू केली. अखेर टोल प्रशासनाकडून ठोस आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलनकर्ते मवाळ झाले आणि सुमारे साडे चार तासांच्या खंडानंतर दुपारी साडेबारा वाजता टोल वसुली पुन्हा सुरळीत करण्यात आली. दरम्यान, या दोन तासांच्या टोलमुक्त कालावधीत छोट्यामोठ्या वाहनांनी जलदगतीने प्रवास करत आपला फ्री पासचा पूर्ण फायदा घेतला. महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे सुरळीत असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने सांगितले.