निंबाळकरमय फलटण pudhari photo
ठाणे

Nimbalkar legacy : निंबाळकरमय फलटण

सातार्‍याचे निंबाळकर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी काही शतकं फलटणलाच वास्तव्य करून होते.

पुढारी वृत्तसेवा

नीती मेहेंदळे

सातार्‍याचे निंबाळकर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी काही शतकं फलटणलाच वास्तव्य करून होते. एवढंच नव्हे तर सातारा परगण्यातलं ते एक महत्त्वाचं प्रस्थही होतं. आजही त्यांचा भव्य वाडा त्यांच्या गत ऐश्वर्याची आठवण करून देतो. सदर वाडा चौसोपी असून मध्यभागी मोठं चौरसाकृती प्रांगण आहे. या दुमजली वाड्याचे खांब लाकडी आहेत व त्यावर कलाकुसरही सुरेख आहे. फलटणला महानुभाव पंथीयांची ‘दक्षिणकाशी’ म्हणून ओळखलं जात असे. तिथं महानुभाव पंथियांची अनेक मंदिरं आहेत. महानुभाव साहित्यात फलटणचा उल्लेख ‘पालेठाण’ म्हणून केलेला आढळतो.

या शहरामध्ये 13 व्या व 17 व्या शतकातील वैशिष्ट्यपूर्ण मंदिरं आहेत. त्यामध्ये प्राचीन जबरेश्वर मंदिर व त्याच्या शेजारीच राजवाड्याला लागून असलेलं श्रीराम मंदिर ही मंदिरं भाविकांची श्रद्धास्थानं व फलटण शहराचं वैभव मानली जातात. जबरेश्वर मंदिरापासून जेमतेम 50 मीटर अंतरावर राजवाड्याला लागून 250 वर्षांपूर्वीचं श्रीराम मंदिर आहे. या मंदिरात दोन-तीन शिलालेख आढळतात. त्यातल्या एका शिलालेखाप्रमाणे देवनागरी लिपीत फलटणच्या राजघराण्यातील सगुणाबाई निंबाळकर यांनी 1774 साली हे मंदिर बांधले याची नोंद आहे, तर मुधोजी नाईक निंबाळकर यांनी 1875 साली या मंदिरासमोर एका शिलालेखात लाकडी मंडपाचे बांधकाम केल्याची नोंद आहे.

मंदिरात मूर्तिकाम भव्य आहे. आत शिरताना दोन द्वारपाल दिसतात. मंदिर आवारात तीन दगडी व उंच दीपमाळा आहेत. मंदिराची रचना सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी आहे. सभामंडप खुल्या प्रकारातील आहे. या सभामंडपात 32 लाकडी खांब असून ते नक्षीदार कमानीने जोडलेले आहेत. गर्भगृहात श्रीराम, सीता व लक्ष्मण यांच्या उभ्या मूर्ती आहेत. देवदिवाळी दिवशी येथे श्रीराम व सीता यांचा रथोत्सव शहरातील विशेष व मोठ्या उत्सवांपैकी एक मानला जातो. याशिवाय रामनवमी हाही येथील महत्त्वाचा उत्सव आहे.

निंबाळकर वाड्याच्या बाजूलाच जबरेश्वराचं प्राचीन शिवालय दिसतं. शहरात यादव काळात इसवी सन दहावे ते चौदावे शतक अनेक मंदिरे बांधली गेली. त्यापैकी जबरेश्वर एक प्राचीन मंदिर आहे. ते हेमाडपंथी शैलीतील आहे. जबरेश्वर मंदिर हे उत्तराभिमुख असून मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी त्याची रचना आहे. मंदिराचा सभामंडप अष्टकोनी आकाराचा आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर डावीकडील देवकोष्ठात पाच फण्यांची नागीण व तिची दोन पिल्ले व उजवीकडील देवकोष्ठात विठ्ठल-रुक्मिणी, नंदी, कासव, गणपती अशा मूर्ती आहेत. मंदिराच्या गाभार्‍याची द्वारशाखा ही पंचशाखा असून नंदिनी प्रकारात मोडणारी आहे. त्या शाखा नरशाखा, लताशाखा, स्तंभशाखा, व्यालशाखा, पत्रशाखा आहेत.

या मंदिराचे विमान आणि मंडप या दोन्ही वास्तुघटकांचे तलविन्यास सप्तरथ असून विमानावर पूर्वी विटांचे भूमिज शिखर होते. सध्या त्या शिखराच्या फक्त दोन भूमी शिल्लक आहेत. मंदिराच्या रथ-प्रकारावरून ते मंदिर सप्तभूम मंदिर असावे असे वाटते. मंदिरातील मूर्तीत अष्टदिक्पाल व सुरसुंदरी यांच्या मूर्ती लक्षणीय आहेत. या मंदिरात महाशिवरात्री हा प्रमुख उत्सव असतो. त्यामुळे या परिसराला जत्रेचं स्वरूप येतं. याशिवाय त्रिपुरारी पौर्णिमेला येथे दीपोत्सव साजरा होतो.

फलटणला वेशीला वाठार निंबाळकर हे अजून एक न टाळता येण्यासारखं गाव आहे. निंबाळकरांच्या वंशजांचा ठसा या गावातही उमटलेला दिसतो. इथे राममंदिर आहे. या गावात किल्लासदृश असलेली निंबाळकरांची गढी महत्त्वाची आहे. दीड एकराची मध्यवर्ती गढी, सर्व सहापैकी गढ्यांपैकी सर्वोत्तम जतन केलेली दिसते, जी नव बुरुजाचा वाडा म्हणून ओळखली जाते. मुख्य प्रवेशद्वारावर दिंडी दरवाजा आणि नगारखाना आहे. मंदिराच्या अंगणात मोठी विहीर आहे. पाणी काढण्यास पायर्‍या आणि रहाट आहे. इतर पाच गढ्या तुलनेत आकाराने लहान आहेत आणि वेगवेगळ्या प्रमाणात जतन केल्या आहेत.

या गढ्यांपैकी एकामध्ये अजूनही निंबाळकरांच्या एका शाखेचे वास्तव्य आहे आणि ती तुलनेने चांगली राखली गेली आहे. या परिसरात एक विशेष मनोरंजक रचना म्हणजे एक मोठी पायर्‍यांची विहीर आहे जिच्यात किल्ल्याच्या आतून आणि बाहेरूनही पायर्‍यांच्या द्वारे प्रवेश करता येतो. वेढा घातलेला असताना टिकून राहण्यासाठीअशा दुहेरी प्रवेशयोग्य पाण्याच्या संरचना महत्त्वाच्या होत्या. सातार्‍यात अशी अनेक स्वयंभू गावं आहेत ज्यांचा इतिहास, रचना, त्यातलं स्थापत्य आपल्याला आजही स्तिमित करून सोडतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT