निळजे आरोग्य केंद्रातील 5 दांंडीबहाद्दर कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. Pudhari Photo
ठाणे

निळजेच्या आरोग्य केंद्रातील 5 दांडीबहाद्दर कर्मचारी निलंबित

परवानगी शिवाय गैरहजर राहिल्याचा ठपका

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण-शिळ महामार्गावरील निळजे गावच्या हद्दीत जिल्हा परिषदेचे आरोग्य केंद्र आहे. या केंद्रातील पाच कर्मचारी परवानगी शिवाय गैरहजर राहिले होते. हा प्रकार पाहणी दौऱ्यादरम्यान निदर्शनास आल्यानंतर ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी ऑन द स्पॉट या पाचही दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. या केंद्रातील आरोग्य सहाय्यक जगन्नाथ धनगर, औषध मिश्रक विनोद पवार, परिचारिका चव्हाण, आरोग्य सेविका निलिमा चव्हाण आणि कनिष्ठ सहाय्यक हरड यांचा निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये समावेश आहे.

पदभार स्वीकारल्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्याने नागरी सेवेसाठी आपल्या कामात कर्तव्यतत्पर राहण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी दिले होते. दोन दिवसापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे ग्रामीण अंबरनाथसह कल्याण-डोंबिवलीच्या ग्रामीण भागात दौऱ्यावर होते. ठाणे येथून निघाल्यानंतर प्रथम त्यांनी कल्याण-शिळ महामार्गावरील निळजे गावच्या हद्दीत असलेल्या आरोग्य केंद्राला भेट देण्याचा अचानक निर्णय घेतला. या दौऱ्याची कोणत्याही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना माहिती नव्हती.

तथापि, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी अचानक निळजे आरोग्य केंद्रात जाऊन आरोग्य सेवा आणि रूग्णांना देण्यात येणाऱ्या सेवेची माहिती घेण्यासाठी भेट दिली. त्यावेळी तेथे शिपायाच्या व्यतिरिक्त कुणीही कर्मचारी उपस्थित नव्हते. इतर कर्मचारी कुठे आहेत ? रूग्ण आल्यानंतर त्याला येथे सेवा कोण देतो ? आदी प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर उपस्थित शिपाई गोंधळून गेला. ग्रामीण भागातील महत्वाचे आरोग्य केंद्र असताना या केंद्रातील पाचही कर्मचारी एकाचवेळी गैरहजर असल्याचे निदर्शनास आल्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे संतप्त झाले. परवानगी शिवाय केंद्रात गैरहजर असलेल्या पाचही आरोग्य कर्मचाऱ्यांना घुगे यांनी ऑन द स्पॉट निलंबित केले. आता या दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT