शिक्षणमंत्री दादा भुसे  file photo
ठाणे

पुढच्या वर्षाचे शैक्षणिक कामकाज 234 दिवसांचे

शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : आतापर्यंत 15 एप्रिलपर्यंत परीक्षा घेण्याची पद्धत रूढ होती. मात्र, नव्या वेळापत्रकानुसार परीक्षा मार्चपर्यंत पूर्ण करून एप्रिलपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू केले जाणार आहे. शैक्षणिक वर्षाच्या कामकाजाचे दिवस 234 असणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी विशेष वर्ग घेतले जाणार असून, शालेय शिक्षणात नवे बदल होतील, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली.

राज्यातील शाळांमध्ये पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा, संकलित चाचणी 2 यासाठी जाहीर केलेल्या वेळापत्रकाबाबतच्या शिक्षकांनी मांडलेल्या समस्यांच्या खोलात जाऊन आवश्यकतेनुसार उपाययोजना केल्या जातील, असे राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे आयुक्त राहुल रेखावार यांनी स्पष्ट केले.

राज्यातील पहिली ते नववीच्या परीक्षा एकाच वेळी घेण्यासाठीचे वेळापत्रक राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने जाहीर केले आहे. त्यानुसार 8 ते 25 एप्रिल या कालावधीत नियतकालिक मूल्यांकन चाचणी, संकलित चाचणी 2 या परीक्षा घ्याव्या लागणार आहेत. परीक्षा एप्रिलअखेरपर्यंत लांबणार असल्याने उत्तरपत्रिका तपासणे, निकाल तयार करण्यास वेळच मिळणार नसल्याचा मुद्दा शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून उपस्थित करण्यात आला. या अनुषंगाने मुख्याध्यापक संघ महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांनी शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावार यांची भेट घेऊन वेळापत्रकात बदल करण्याची मागणी केली.

बीए/बीएस्सी बीएडऐवजी आता असणार ‘आयटीईपी’

शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून चार वर्षांचा बीए बीएड आणि बीएससी बीएड (एकात्मिक) अभ्यासक्रम रद्द करण्यात आला असून त्याऐवजी चार वर्षांचा एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम (आयटीईपी) अभ्यासक्रम केंद्रीय स्तरावर सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमांची सीईटी राज्यातील सीईटी सेलकडून नव्हे, तर एनटीएकडून घेतली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना नव्याने एनटीएच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. राष्ट्रीय अध्यापक शिक्षक परिषदेने यंदापासून देशभरात सुरू असलेले 4 वर्षीय बीए/बीएससी बीएड (एकात्मिक) अभ्यासक्रम बंद केले आहेत. याऐवजी यंदापासून चारवर्षीय एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण या अभ्यासक्रम सुरू केला आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने चार वर्षांच्या बीए/बीएससी - बीएड (एकात्मिक) अभ्यासक्रमासाठी सामाईक प्रवेश परीक्षा आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येऊ नये असे सीईटी सेलला कळविले आहे. हाच अभ्यासक्रम केंद्रीय स्तरावर एकत्र करत परिवर्तीत केला आहे. यामुळे सीईटी सेलकडून घेण्यात येणारी सीईटी यंदा होणार नाही. सामाईक प्रवेश कक्षाकडून आता या सीईटीसाठी भरलेले शुल्क विद्यार्थ्यांना परत केले जाणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT