अंबाडी : अवघ्या काही तासांवर आलेल्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी देवस्थान आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक पर्यटक येत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने आणि कायदा सुव्यवस्था रहावी यादृष्टीने गणेशपुरी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहेत.
वज्रेश्वरी, गणेशपुरी आणि अकलोली या तीर्थक्षेत्र आणि पर्यटन परिसरात सरत्या वर्षाला नाच गाणी करीत निरोप देण्यासाठी आणि पवित्र गरम पाण्याच्या कुंडांमध्ये स्नान करून वज्रेश्वरी देवीचे आणि भगवान नित्यानंद स्वामी समाधी मंदिराचे दर्शन घेऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी येथे हजारो भाविक आणि पर्यटक दरवर्षी येत असतात. त्यादृष्टीने येथील हॉटेलचालक, रिसॉर्ट, लॉज सज्ज झाले आहेत. यासाठी त्यांनी आकर्षक रोषणाई करीत आगाऊ ग्रुप बुकिंग चालू केली आहे. तर दरवर्षीप्रमाणे हजारो भाविक दर्शनासाठी येणार त्यामुळे वज्रेश्वरी आणि गणेशपुरी देवस्थाननेही पूर्ण तयारी केली आहे. आणि स्थानिक गणेशपुरी पोलीस ठाण्याने अंबाडी नाका आणि वज्रेश्वरी या ठिकाणी नाकाबंदी ठेवली असून हॉटेल, ढाबाचालक, रिसॉर्ट याठिकाणीही पोलिसांची गस्त असणार आहे. अकलोली कुंड येथे अधिकचा बंदोबस्त रात्रीपासून पहाटेपर्यंत गस्त असा बंदोबस्त ठेवला आहे. तर 12 वाजेनंतर दारू पिऊन वाहन चालवताना आढळल्यास ड्रक अँड ड्राइव्हची कारवाई पोलिसांकडून करण्यात येणार आहे. वरील सर्व बंदोबस्तसाठी गणेशपुरी पोलीस ठाण्याचे तीन अधिकारी आणि 25 कर्मचारी यासाठी नियुक्त केले आहे तर भाविक पर्यटकांनी या ठिकाणी आल्यावर जास्त हुल्लडबाजी न करता नवीन वर्षाचे स्वागत करून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन गणेशपुरी पोलीस ठाणे यांनी केले आहे.
अंबाडी नाका, दुगाड फाटा आणि वज्रेश्वरी या तीन ठिकाणी नाका बंदी असणार असून अकलोली कुंड आणि तानसा नदी किनारा या ठिकाणी हुल्लडबाजी करणार्याकडे अधिक लक्ष असणार आहे. यावेळी जास्त दंगा भांडण करणार्याची गय केली जाणार नाही.संदीपान सोनवणे, पोलीस निरीक्षक, गणेशपुरी पोलीस ठाणे