ऑटिझमग्रस्त मुलांची वाढती संख्या चिंतेचा विषय pudhari photo
ठाणे

Autism Research : ऑटिझमग्रस्त मुलांची वाढती संख्या चिंतेचा विषय

एकूण मुलांच्या २ टक्के मुले स्वमग्न; शिक्षणाच्या सुविधाही अपुऱ्या

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : राज्यात सुमारे २ टक्के मुले ऑटिझमने प्रभावित असल्याचा अंदाज असून, या पार्श्वभूमीवर ऑटिझमच्या व्यवस्थापनासाठी आतड्यांतील सूक्ष्मजीवांवर आधारित नवीन उपचार पद्धतीमुळे काही मुलांमध्ये लक्षणीय सुधारणा दिसल्याचा दावा संशोधकांकडून करण्यात आला आहे.

हैदराबादस्थित ‘रिस्प्लाइस ऑटिझम रिसर्च फाउंडेशन’चे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर थोडुपुनुरी यांच्या नेतृत्वाखाली फेकल मायक्रोबायोटा ट्रान्सप्लांटेशन या उपचारावर केंद्रित संशोधन सुरू असून, काही रुग्णांमध्ये सुमारे ५० टक्क्यांपर्यंत सुधारणा झाल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. आतड्यांतील जीवाणू संतुलन व मेंदू कार्य यांच्यातील संबंधावर आधारित ही थेरपी ऑटिझम व्यवस्थापनासाठी एक नवी दिशा ठरू शकते, असा दावा केला जात आहे.

ऑटिझम हा मेंदूच्या विकासाशी संबंधित न्यूरोडेव्हलपमेंटल विकार असून, त्याचा परिणाम मुलांच्या संवाद कौशल्य, सामाजिक वर्तन आणि शिकण्याच्या क्षमतेवर होतो. अशा मुलांना भाषिक विकासात उशीर, डोळ्यांचा संपर्क कमी असणे, पुनरावृत्तीचे वर्तन आणि संवेदनशीलतेतील बदल यांसारख्या अडचणी जाणवतात. या स्थितीमुळे केवळ मुलांचे दैनंदिन जीवनच प्रभावित होत नाही, तर पालकांवरही मोठा मानसिक, आर्थिक आणि सामाजिक ताण येतो.

अनेक कुटुंबांना दीर्घकालीन उपचार, थेरपी आणि समाजातील गैरसमजांशी सामना करावा लागतो. डॉ. थोडुपुनुरी यांच्या संशोधनानुसार, ऑटिझमचा संबंध आतड्यांतील मायक्रोबायोम आणि मेंदू यांच्यातील ‘गट–ब्रेन अक्ष’शी जोडला जाऊ शकतो. त्यांच्या संस्थेने आयसीएमआरसोबत दोन वर्षांचा संशोधन अभ्यास केल्याचा दावा केला असून, या थेरपीद्वारे आतड्यांतील सूक्ष्मजीवांचे संतुलन पुनर्स्थापित करून काही मुलांमध्ये वर्तनात्मक आणि पचनाशी संबंधित सुधारणा दिसल्याचे ते सांगतात. त्यांच्या मते, काही प्रकरणांमध्ये लक्षणांमध्ये जवळपास ५० टक्क्यांपर्यंत सुधारणा नोंदवली गेली आहे.

ऑटिझमची सुरुवात गर्भावस्थेतच होऊ शकते आणि पर्यावरणीय घटक, रसायनांचा संपर्क तसेच आतड्यांच्या आरोग्याचा गर्भातील विकासावर परिणाम होऊ शकतो.

ही उपचार पद्धती काय आहे?

फेकल मायक्रोबायोटा ट्रान्सप्लांटेशन ही आतड्यांतील सूक्ष्मजीवांचे संतुलन सुधारण्यावर आधारित एक प्रयोगात्मक वैद्यकीय उपचार पद्धती आहे. या प्रक्रियेत निरोगी दात्याच्या आतड्यांतील उपयुक्त जिवाणू रुग्णाच्या पचनसंस्थेत स्थानांतरित केले जातात, ज्यामुळे आतड्यांतील सूक्ष्मजीवांचे नैसर्गिक संतुलन पुन्हा प्रस्थापित होण्यास मदत होऊ शकते. ही पद्धत प्रामुख्याने काही गंभीर आतड्यांच्या संसर्गांवर उपचारासाठी वापरली जाते; मात्र अलीकडे तिचा अभ्यास ऑटिझमसह काही न्यूरोडेव्हलपमेंटल आणि मेटाबॉलिक विकारांमध्येही संभाव्य उपयोगासाठी केला जात आहे. आतड्यांचे आरोग्य आणि मेंदू यांच्यातील ‘गट–ब्रेन अक्ष’ या संकल्पनेवर आधारित ही थेरपी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT