ठाणे : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटेकोशी नदीला आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेले ठाणे जिल्ह्यातील पर्यटक अडकले आहेत. त्यांपैकी पाटणकर दाम्पत्य अन्य २७ पर्यटकांसह चीन सीमा स्थलांतरण केंद्रात सुरक्षित पोहोचले असून, इतर पर्यटकांचा पुराच्या तडाख्यानंतर संपर्क होऊ शकलेला नाही. नेपाळमध्ये पूरस्थितीत अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाइकांनी तात्काळ ठाणे जिल्हा आपत्कालीन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील समतानगर येथील रेखा सतीश पाटणकर आणि सतीश पाटणकर हे दाम्पत्य २७ पर्यटकांसह सुखरूप पोहोचले आहे. मात्र, नौपाड्यातील घंटाळी परिसरातील समीर जोशी व अपर्णा जोशी हे दाम्पत्य २६ ऑगस्ट रोजी नेपाळ-चीन सीमेवर पोहोचल्यानंतर त्यांचा संपर्क तुटला आहे. तसेच डोंबिवली येथील पलावा संकुलातील सुनील सुदर्शन सुभेदार यांचाही शोध लागत नाही.
कल्याणमधील आधारवाडी चौकातील संजय राजमल पाटील व नलिनी संजय पाटील या दाम्पत्यासह त्यांच्यासोबतचे ३१ पर्यटक केरुंग मार्गे काठमांडूतील हॉटेल शंकर येथे उतरले होते. मात्र, त्यानंतर त्यांचा संपर्क तुटल्याने नेपाळ टुरिस्ट बोर्डाने जारी केलेल्या बेपत्ता पर्यटकांच्या यादीत त्यांचा समावेश आहे. याशिवाय ठाण्यातील बाळकूम येथील रजनीश रघुनाथ नातू आणि वाशी येथील भांड यशास या पर्यटकांचाही अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही.
नातेवाइकांसाठी महत्त्वाची माहिती व हेल्पलाईन:
नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांची माहिती प्रशासनाला देण्यासाठी कुटुंबीयांनी संबंधित व्यक्तीचे संपूर्ण नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील शेवटचे ठिकाण/हॉटेलचे नाव, टूर ऑपरेटरचा तपशील आणि सोबत असलेल्या व्यक्तींची नावे जिल्हा प्रशासनाकडे नोंदवावीत.
टोल फ्री क्रमांक: १०७७
जिल्हा आपत्कालीन नियंत्रण कक्ष: +91 9372338827 / 022-25301740
ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. आपत्तीग्रस्त भागातील पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन नेपाळमधील संबंधित यंत्रणांशी सातत्याने समन्वय ठेवून आहे.