ठाणे ः जागतिक कीर्तीचे दिवंगत कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी उभारलेल्या एन. डी. स्टुडिओला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी राज्य शासनाने नानाविध उपक्रम हाती घेतले आहे. गेल्या वर्षापासून या स्टुडिओमध्ये चित्रपटांच्या चित्रीकरणास प्रारंभ झाला आहे. या स्टुडिओचा उपयोग केवळ चित्रीकरणासाठीच नाहीतर त्याचा पर्यटन स्थळ म्हणून विकास व्हावा, यासाठी राज्यशासनाच्या वतीने मास्टर प्लॅन तयार करण्यात येत आहे. सध्या स्टुडिओत असलेल्या चित्रीकरण स्थळांची डागडुजी सुरू आहे.
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील कर्जत रस्त्यावरील चौक फाटा येथे असलेला एन. डी. स्टुडिओ नितीन देसाई यांनी सुमारे 46 एकरवर उभारणी केली आहे. या स्टुडिओत जोधा अकबर, बाजीराव मस्तानी, प्रेम रतन धन पायो अशा अनेक चित्रपटांचे चित्रीकरण सेट्सची उभारणी देसाई यांनी केली होती. याशिवाय शिश महल, खेडे गाव, परदेशी स्थळे, चित्रपट संग्रहालय यांचा समावेश आहे.
याशिवाय येथे 100 निवासी खोल्या आणि छोटेखानी बंगले आहेत. देसाई यांच्या निधनानंतर गेल्या वर्षी नोव्हेंबर 2024 मध्ये राज्य शासनाने एन. डी. स्टुडिओ ताब्यात घेतला. या स्टुडिओची जबाबदारी राज्य शासनाने महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाकडे सोपवली आहे. या स्टुडिओचा कारभार पाहण्यासाठी सहाय्यक लेखाधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अशी तीन पदेही भरण्यात आली आहे.
नितीन चंद्रकांत देसाई हे जागतिक कीर्तीचे कला दिग्दर्शक होते. देसाई यांनी या स्टुडिओत उभारलेल्या सेट्सची डागडुजी करण्याचे काम शासनाने हाती घेतले आहे. या स्टुडिओचे आहे ते सौंदर्य शासन जतन करणारच आहे. परंतू पुन्हा येथे चित्रीकरण मोठ्या प्रमाणात व्हावे, तसेच मुंबई-पुण्यासाठी मध्यवर्ती असलेल्या या स्टुडिओचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्याचा शासनाचा मानस आहे. त्यासाठी मास्टर प्लॅन करण्याचे काम हाती घेतले आहे. सध्या या स्टुडिओ मध्ये विविध कला माध्यमांच्या चित्रीकरणासह, प्री वेडिंग शूट, विविध समारंभ होत आहेत. तो प्रतिसाद वाढावा यासाठी आम्ही विविध उपक्रम हाती घेतले आहेत.मीनल जोगळेकर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी. एन. डी.स्टुडिओ