डोंबिवली : कल्याण पूर्वेकडील काटेमानिवली परिसरात आई आणि भावासह राहणारी अकराव्या इयत्तेतील विद्यार्थिनी बेपत्ता झाली आहे. दहावीची गुणपत्रिका हरविल्याची तक्रार कोळसेवाडी पोलिस ठाण्यात देऊन तेथून ती कागदपत्रे घेऊन नवी मुंबईतील वसतीगृहात जाते असे आईला सांगून बुधवारी (दि.23) रोजी घरातून निघून गेली. तीन दिवस उलटूनही आपली मुलगी घरी न आल्याने तिच्या आईने कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून बेपत्ता मुलीला हुडकून काढण्यासाठी तपास चक्रांना वेग दिला आहे.
बेपत्ता झालेली १७ वर्षीय मुलगी कल्याण पूर्वेकडे असलेल्या काटेमानिवलीतील जुने विठ्ठल मंदिर परिसरात २० वर्षीय भाऊ आणि आईसह राहते. ही मुलगी अकराव्या इयत्तेपर्यंत शिकली आहे. बुधवारी (दि.23) सकाळी तिने दहावीची गुणपत्रिका हरवल्याचे सांगितले. त्याची तक्रार देण्यासाठी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात जाते. तेथून मिळणारी कागदपत्रे घेऊन नवी मुंबईत वसतीगृहात जाणार असल्याचे मुलीने तिच्या आईला सांगितले. मुलीच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन आईने तिला बाहेर जाण्याची परवानगी दिली. बाहेरील सर्व कामे पूर्ण करून मुलगी बुधवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत घरी येणे अपेक्षित होते. मात्र सायंकाळ उलटूनही मुलगी घरी परतली नाही, म्हणून आईने विठ्ठलवाडी भागात शोध घेऊन तिच्या मैत्रिणींशी संपर्क साधला. मात्र मुलीचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे आपल्या मुलीला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले असण्याची शक्यता वर्तवून आईने कोळसेवाडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने बेपत्ता मुलीचा शोध सुरू केला
गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत कल्याण पूर्व भागातून तीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. कल्याणच्या पूर्व परिसरात असे प्रकार वाढत असल्याने एकीकडे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. तर दुसरीकडे पोलिसांचीही डोकेदुखी वाढली आहे.